दुसरी बाजूही समजून घ्या! विनयभंगाच्या आरोपावर विजय राज याने सोडले मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कौव्वा बिर्यानी’फेम अभिनेते विजय राज यांनी त्यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपाबाबत मौन सोडले आहे. या प्रकरणी लोकांनी दुसरी बाजू समजून घेणेही गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणतीही एकच बाजू जाणून मते बनवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. या आरोपांमुळे आपल्यासह कुटुंबीयांना मनस्ताप हन करावा लागला असून आपले एवढ्या वर्षांचे करिअर धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांपर्यंत दुसरी बाजू पोहचत नसल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली.

‘शेरनी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गेल्या आठवड्यात विजय राज यांनी सेटवरील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी विजय राज यांना अटक केली होती. त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यावर राज मुंबईत परतले. या घटनेनंतर चित्रपटातील आपले काम थांबवण्यात आल्याचा ईमेल आल्याचे राज यांनी सांगितले. या आरोपांच्या चौकशीसाठी समिती (आयसीसी) स्थापन करण्यात आली आहे.

याप्रकरणी कोणतही चौकशी झाली नसताना फक्त आपल्यावर आरोप झाले म्हणून आपले काम थांबवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. आपल्याला 21 वर्षांची मुलगी असल्याने या प्रकरणातील गांभीर्याची आपल्याला जाण आहे. या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे राज यांनी सांगितले. मात्र, चौकशीपूर्वीच आपले काम थांबवण्यात आल्याने धक्का बसल्याचे राज यांनी सांगितले. याबाबतच्या भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. 23 वर्षांपासून आपण या क्षेत्रात काम करत आहोत. आपण खूप मेहनतीने कारकिर्द घडवली आहे.

एका आरोपामुळे एवढ्या वर्षांची मेहनत मातीमोल होत आहे. मी विनयभंग केला, असा आरोप झाला आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. दुसरी बाजू समजून न घेताच अनेकजण मते बनवतात. या प्रकरणाच्या चौकशीतून काय निष्पन्न होईल, ते माहीत नाही, मात्र, माझ्यावर कायमचा ठपका लागला. चौकशीपूर्वीच मला दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे आपल्या करिअरवर वाईट परिणाम झाला असून आपल्या कटुंबीयानांही मनस्तापाला समोरे जावे लागत आहे. आमच्याकडे बघण्याच्या समाजाच्या नजरा बदलल्या आहेत, असे ते म्हणाले.

आरोप केलेल्या महिलेशी आपले चांगले संबंध आहेत. काही वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतो. सेटवर आम्ही क्रिकेटही खेळलो आहोत. मात्र,गैरसमजामुळे हे सर्व घडले आहे. कामाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्यानंतर आपण तिची माफीही मागितली. माफी मागितली याचा अर्थ आपण आरोप स्वीकारले आहेत, असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाचा एकतर्फी विचार होऊ नये, असे ते म्हणाले.

या घटनेबाबत त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. चौकशीच्या समितीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगतिले. घटनेनंतर राज यांनी महिलेची माफी मागितल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे विजय राज यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांची समाजातील प्रतिमा डागाळली आहे, त्यामुळे या प्रकरणतील राज यांची बाजूही लोकांसमेर येण्याीची गरज राज यांचे वकील सविना बेदी सच्चर यांनी व्यक्त केली. राज यांनी कोणतीही चूक केली नाही. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप अयोग्य असल्याचेही सच्चर यांनी सांगितले.

आपण चौकशीसाठी तयार असून अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहोत. मात्र, चौकशीपूर्वीच आपले काम थांबवण्यात आले आहे. आपल्या एवढ्या वर्षांच्या काररिर्दीतवर एका आरोपामुळे परिणाम झाला आहे. आपल्याला आणि कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबतच्या भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.
-विजय राज, अभिनेते