
दीपावली सणात खासगी बसेसमधून होणाऱ्या प्रवासासाठी जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा येथील प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.
खासगी बसेस बुकिंग काऊंटरवर मोटार वाहन विभाग अधिकाऱ्यां- मार्फत याबाबत प्रबोधन करण्यात आले असून, सूचना फलक लावण्यात आला आहे.
दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाकडुन नक्की कारवाई होणार की नुसता फार्स याची उत्सुकता प्रवाशांना लागुन राहिली आहे.
सुट्टीत खासगी बस मालकांकडुन प्रवाशांची अक्षरशः लुटमार केली जाते. तिकिटाचे दर दुप्पट, तिप्पट केले जातात. यावरुन अनेक वेळा प्रवाशांशी वादावादीचे प्रकारही घडले आहेत.
वाहन प्रकारानुसार परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडे आकारणीच्या दीडपट पर्यंत भाडे खासगी बसेस द्वारा आकारले जाण्याची शक्यता गृहीत धरून, प्रादेशिक परिवहन विभागाकडुन नियंत्रण ठेवण्यात पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार कोणत्याही खाजगी बसकडुन ज्यादा भाडे आकारणी केल्यास, तक्रारदाराने आपले नाव, मोबाईल क्रमांक, प्रवासाचा दिनांक, तिकीट, वाहनाचा प्रकार,ट्रॅव्हल्सचे नाव आदी माहितीसह mh09@ mahatranscom.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे.


























































