
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आधारस्तंभ शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी खो-खो खेळात वेगाला अत्यंत महत्त्व आहे. वेग वाढविण्यासाठी सरावामध्ये स्टेप टाकण्याची पद्धत, खो-खो खेळताना चौकोनात बसून पुन्हा वर उठण्याची वेगवान क्रिया करण्यासाठी आवश्यक कसरती सातत्याने केल्या पाहिजेत, असे फिजिओथेरेपीस्ट डॉ. कश्मीरा सबनीस यांनी सांगितले.
खो-खो खेळात प्रवेग, दिशा बदलणे, प्रतिक्रिया, विशिष्ट दिशेने जाण्याचा वेग, वेगातील दमदारपणा या पंचसूत्रीला महत्त्व आहे. त्याचा अवलंब केल्यास खो-खो खेळातील वेग वाढवणे शक्य आहे. वेग आणि चापल्य हे दोन्ही खो-खो खेळासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या दृष्टीने आवश्यक अशा कसरतीचे विशेष नियोजन केले पाहीजे असे सांगितले. डॉ. कश्मीरा सबनीस यांनी कसरतींची प्रात्यक्षिके करून दाखवली. कसरती करताना प्रशिक्षकांचे खेळाडूंवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेगासाठी अडथळ्यांवरून उडय़ा मारण्याच्या कसरतींचे नियोजन करायला हवे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या आरंभी खो-खो प्रशिक्षक सत्या कुमार यांना श्रद्धांजली वाहीली. खो-खोविषयी तळमळ असलेली व्यक्ती हरपली, अशी प्रतिक्रिया खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी व्यक्त केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या उपाध्यक्षा ग्रिष्मा पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त वैशाली वेदक यांनी उपक्रमाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र साप्ते यांच्यासह प्रा. शिरीष मोरे, समीर चुनेकर, आकाश सावले यांचे सहकार्य लाभले.




























































