
कोरोना प्रतिबंधाची चिंता आता सोडा, आमच्या कंपनीने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस 95 टक्के प्रभावी ठरली असून ती सुरक्षित ठेवण्यासाठी मोठय़ा शीतगृहांची गरज भासणार नाही असा जगाला दिलासा देणारा दावा अमेरिकेतील नामांकित औषध निर्मिती कंपनी मॉडर्नाने सोमवारी केला आहे.
मॉडर्नाच्या लसीची तिसरी चाचणी अतिशय उत्साहवर्धक निष्कर्ष देणारी ठरल्याचे कंपनीचे सीईओ स्टीफन बैंसल यांनी जाहीर केले आहे. मॉडर्नाच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीची अंतिम चाचणी 30 हजार स्वयंसेवकांवर नुकतीच पार पडली. या चाचणीतून ही लस कोरोनाला रोखण्यात 94.5 टक्के यशस्वी ठरलीय असा दावा मॉडर्नाने केला आहे. शिवाय हि लस सुमारे 30 दिवस किमान 2 ते 8 डिग्री तापमानात सुरक्षित राहू शकते. त्यामुळे लस साठवण्यासाठी महागडय़ा डीप फ्रीझर यंत्रणेची गरजच भासणार नाही असे मॉडर्नाचे म्हणणे आहे. यंदा जानेवारीपासून आम्ही या लसीवर काम करीत आहोत, अखेर आमच्या प्रयत्नांना मोठे यश लाभलेय असे मॉडर्नाचे सीईओ बैंसल यांनी सांगितले.
पुढील वर्षापर्यंत जगासाठी 1 अब्ज डोस बनवणार
सर्वप्रथम अमेरिकेला कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 कोटी डोस मॉडर्ना लवकरच पुरवणार आहे. कंपनी 2021 या वर्षात जगासाठी 50 कोटी ते 1 अब्ज लसींचे डोस तयार करणार आहे. ही लस आपल्या नेहमीच्या तापमानात 24 तास तर 2 ते 8 डिग्री सेल्सिअस या तापमानात 30 दिवस सुरक्षित राहू शकते. त्यामुळे शीतगृह साखळीची गरज लस सुरक्षित ठेवण्यासाठी लागणार नाही असा मॉडर्नाचा दावा आहे.
जगभरातील वैद्यकीय तज्ञांत आनंदाचे वातावरण
अमेरिकन मॉडर्ना कंपनीच्या प्रभावी कोरोना लसीच्या वृत्ताने जगभरातील वैद्यकीय तज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोनाच्या संकटापुढे हतबल झालेल्या जगाला या लसीमुळे नक्कीच दिलासा लाभेल असे त्यांचे मत आहे. नॅशनल इंस्टीटय़ूट ऑफ एलर्जी अॅण्ड इन्फेक्शियस डिसीजचे डायरेक्टर डॉ. एंथनी फौसी मॉडर्नाच्या लसीने कोरोनाचे संकट संपविण्याची मोठी आशा निर्माण झाल्याचे सांगून म्हणाले,मॉडर्नाच्या लसीच्या चाचणीचे निकाल अतिशय उत्साहवर्धक आहेत. त्यात कोणतीही विपरीत प्रक्रिया स्वयंसेवकांवर झाल्याची माहिती नाहीय. त्यामुळे ही लस आता कोरोनाला नक्कीच हद्दपार करेल असे मला वाटतेय असा विश्वासही फौसी यांनी व्यक्त केला.























































