धावत्या ‘रोरो’तून ट्रक कोसळला, कोकण रेल्वे मार्गावर विचित्र अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकानजीकच्या सुकिवली गावानजीक धावत्या रोरो ट्रेनमधून मालवाहू ट्रक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

रायगड जिह्यातील कोलाड येथून वेरणा इथे जाण्यासाठी निघालेली रोरो दिवाणखवटी आणि खेड स्थानकांदरम्यान असलेल्या सुकिवली गावानजीक आली असता रोरोवर बांधण्यात आलेला मालवाहू ट्रक अचानक निसटला आणि रेल्वे रुळावर आदळला. स्टीलच्या प्लेटस् भरून रोरो रेल्वेने गोवा इथे हा ट्रक नेण्यात येत होता. ट्रक आदळल्यामुळे झालेल्या प्रचंड आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले.

या विचित्र दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नसली तरी मालवाहू ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र धावत्या रोरोतून ट्रक कसा निसटला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तर या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.