
नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. महापालिका, जिल्हा परिषदांमार्फत शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सॅनिटाझेशन सुरू आहे. मात्र बहुसंख्य पालक पाल्याला शाळेत पाठविण्याच्या तयारीत दिसत नाहीत. पालकांची पसंती ऑनलाईन शिक्षणालाच असून अद्यापही बरेच विद्यार्थी त्यांच्या मूळ गावीच आहेत. तर काही पालकांनी डिसेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.
पालकांच्या समंतीशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने याधीच जारी केल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांनी पालकांना ‘हमीपत्रा’विषयी माहिती दिली आहे. मात्र पालकांकडून मुख्याध्यापकांना हमीपत्र मिळालेले नाही. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले,’ नववी व दहावीसाठी बोरिवली येथील आमच्या शाळेत 70 विद्यार्थी आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यावर त्यांपैकी केवळ 25 टक्केच विद्यार्थी हजेरी लावतील,’ असा अंदाज आहे.
150 शाळांचे निर्जंतुकीकरण पूर्ण
मुंबई महापालिकेने आतापर्यंत सर्व माध्यमिक शाळांचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी दिली. 20 ते 23 नोव्हेंबरदरम्यान पुन्हा एकदा सर्व 150 शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सुमारे 90 टक्के पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतील असा अंदाज आहे. ज्या शाळांमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यांचेही निर्जंतुकीकरण पूर्ण झाले आहे.
चाचणीसाठी आधारकार्ड, शाळेचे ओळखपत्र आवश्यक
मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत वार्डनिहाय अॅटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. मुंबई विभागात राहणाऱया शिक्षकांनी ते राहत असलेल्या घराजवळील आरोग्य केंद्रावर चाचणी करून घ्यायची असून चाचणीसाठी जाताना आधारकार्ड तसेच शाळेचे ओळखपत्र सोबत नेणे आवश्यक आहे.

































































