
कोरोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठमोठ्या उद्योगधंद्यापासून ते हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक फटका बसला. हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या उभी राहिली आहे. त्यामध्ये रस्त्यावरील टपऱ्यांवर किंवा स्टॉलवर काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. हातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा अनेकांना फायदा होत आहे.
कोरोना संकटाच्या काळात 2 जुलैला या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेतंर्गत 25 लाख जणांनी अर्ज केले आहेत. तर 12 लाख जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक साडेसहा लाख जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 3.27 लाख अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात स्वनिधी योजनेसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
आता अनलॉकच्या काळात अनेक उद्योगधंदे सुरू झाले आहेत. मात्र, रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री करणारे, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. अशा लोकांना पुन्हा रोजगार सुरू करता यावा, यासाठी सरकार स्वनिधी योजनेतंर्गत कर्ज देत आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून रोजगार पुन्हा सुरू करण्यासाठी या योजनेचा अनेकांना फायदा होत आहे.
या योजनेतंर्गत 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. फक्त कर्जपुरवठा करणे हा या योजनेचा हेतू नसून हातावर पोट असणाऱ्यांनी स्वतःचा विकास करून आर्थिक उन्नती करावी, यासाठी ही योजना सुरू केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. निधी नसल्याने रोजगार सुरू करता येत नसेल तर या योजनतंर्गत 10 हजाराचे कर्ज मिळवून रोजगार सुरू करता येत आहे. या योजनेसाठी जवळच्या बँकेत अर्ज करावा लागणार आहे.
कोरोना संकटाच्या काळात आत्मनिर्भर भारत या अभियानाला सरकारने सुरुवात केली आहे. या योजनेतंर्गत 50 लाख जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही हमीची गरज नाही. हे कर्ज वर्षभरात मासिक हप्त्यांमध्ये फेडावे लागणार आहे. वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांना 7 टक्के वार्षिक व्याजावर सबसिडी मिळणार आहे. तसेच 1200 रुपयांपर्यंतची कॅशबॅकची सुविधाही देण्यात येत आहे.



























































