
सुरक्षा दलांनी गुरुवारी पहाटे पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. जम्मूमध्ये पुलवामासारखा मोठा हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता. त्यासाठी ट्रकमधून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे आणली होता. मात्र सुरक्षा दलांनी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नगरोटाजवळील बन टोल नाक्यावर त्यांचा कट उधळून लावला. चौघेही ’जैश-ए-मोहम्मद’चे दहशतवादी असल्याचा संशय आहे.
गुरुवारी पहाटे 4.50 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी दोन तासांतच दहशतवाद्यांचा गेम खल्लास केला. ट्रकचालक मात्र फरार आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. तसेच ग्रेनेड्सही फेकले. यात दोघे पोलिस जखमी झाले. चकमकीत मारलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. ते ट्रकमधून शस्त्रसाठा घेऊन श्रीनगरला जात होते. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडील 11 एके-47 रायफल्स, 3 पिस्तुल, 29 ग्रेनेड, 6 यूबीजीएल ग्रेनेड, मोबाईल फोन, कंपास, बॅग जप्त केली आहे. त्यांचा कश्मिर खोऱयात मोठा हल्ला घडवून जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीला टार्गेट करण्याचा मनसुबा होता. ते ट्रकमधील तांदळाच्या गोण्यांच्या आड लपले होते. सुरक्षा दलांना संशय येऊ नये म्हणून ट्रकवर जम्मू काश्मीरचाच नंबर ठेवला होता, असे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
हिंदुस्थानात घुसणारा एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही
नियंत्रण रेषेवरून हिंदुस्थानात घुसखोरी करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही असा इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी दिला आहे. पहाटे जम्मू-कश्मीरच्या नागरोटा येथे दहशतवादी तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमधून हे दहशतवादी हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. परंतु लष्करी जवान आणि जम्मू-कश्मीर पोलीस यांनी त्यांचा हा मनसुबा उधळून लावला. लष्करप्रमुखांनी या कारवाईची प्रशंसा केली.
























































