
शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर नदीत कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला आणि नदीत कोसळला. ट्रॅक्टरचालकाच्या शेजारी बसलेल्या छबुराव नाटकर यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी ट्रॅक्टरचालक आनंदा गोरे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरेजवळच्या विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर पाठेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर वाजेवाडी येथून ऊसाची वाहतूक करण्यात येत असताना ट्रॅक्टरचालक आनंदा गोरे यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर उलटून नदीत कोसळला. अपघातावेळी चालक गोरे याने उडी मारल्याने तो बचावला आहे. मात्र, चालकाच्या बाजूला बसलेले छबुराव नाटकर ट्रॅक्टरखाली अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक आनंदा सोपान गोरे (रा. मासाळवाडी, ता. बारामती, जि.पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक वणवे करत आहेत.






























































