
राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने अन्य राज्यांतही धास्ती वाढली आहे. दिल्लीतील गंभीर स्थिती लक्षात घेता मुंबई पालिका प्रशासन व महाराष्ट्र सरकारकडून अत्यंत सावधतेने पावले उचलली जात आहेत. मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे सेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संबंधित विभागांशी चर्चा केल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दिवाळीनंतर मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून मुंबईसह राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीशी राज्याचा संपर्प तोडण्याबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे. मुंबई-दिल्ली विमान व रेल्वेसेवा काही बंद करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
दिल्लीतील कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई-दिल्ली विमानसेवा तसेच रेल्वेसेवा बंद ठेवता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसा प्रस्तावही असून तूर्त त्यावर केवळ चर्चा सुरू आहे. यासंदर्भात राज्य सरकारसोबतच नागरी उड्डाण विभाग, रेल्वे मंत्रालय यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे संजयकुमार यांनी स्पष्ट केले.
रेल्वे बंद संदर्भात कोणताही निर्णय नाही – रेल्वे मंत्रालय
दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गाने काही रेल्वे सेवा बंद करण्यात येणार असल्याच्या वृत्ताचे खंडन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. रेल्वेने मुंबई ते दिल्ली सेक्टरमधील रेल्वे ट्रेन बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
























































