महावितरणची वीज समस्येच्या निवारणासाठी ‘एक गाव एक दिवस’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरण रत्नागिरी विभागीय कार्यालयाची ‘एक गाव एक दिवस’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. चांदोर गावात ही मोहीम राबवताना वीज ग्राहकांच्या वीज तारा, खांब याबद्दल असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्णपणे खराब झालेले 12 खांब त्वरित बदलण्यात आले. याशिवाय 14 आधार स्टे नव्याने टाकण्यात आले. गावातील एकूण 42 नादुरुस्त मीटर बदलण्यात आले.

ही सर्व कामे एकाच दिवशी करण्यासाठी अन्य शाखा कार्यालयातील मिळून 22 तांत्रिक कामगार, मे. आस्था इलेक्ट्रिकल,  मे. डांगे इलेक्ट्रिकल व एस. आर. इलेक्ट्रिकल या संस्थांचे सहकार्य घेण्यात आले. उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांच्या नेतृत्वाखाली शोण चारोस्कर, हृषिकेश करंबेळकर, कळेकर, माने, राठोड हे अभियंता व सहाय्यक लेखापाल फडके, रघुनाथ पालकर असे सुमारे 75 कर्मचारी व अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेमुळे गावातील वीज ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत. या वेळी महावितरण पंपनीने सुरू केलेल्या मोबाईल अॅप तसेच ऑनलाइन बिल भरणा प्रक्रियेची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

ग्रामस्थांच्या वतीने सरपंच कोकरे यांनी कार्यकारी अभियंता बेले यांचे या वेळी विशेष कौतुक करून सत्कार केला. या मोहिमेबद्दल मुख्य अभियंता देवेंद्र सायलेकर यांनी समाधान व्यक्त करून अशा प्रकारच्या आदर्श लोकाभिमुख मोहिमा कोकण परिमंडळांतर्गत राबवण्याचे निर्देश सर्वच कार्यकारी अभियंत्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.