
नागपूर नजीकच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एक वाघीण मृतावस्थेत आढळल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या वनरक्षकांना घनदाट जंगलात ही वाघीण दिसून आली.
हे वृत्त कळताच या परिसराचे विभागीय वनाधिकारी राहुल गवई त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी उपलब्ध असलेले पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल यावरून अन्य जंगली श्वापदांशी झालेल्या झटापटीत ही वाघीण मृत झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






















































