
केंद्र सरकारने सार्वजनिक उद्योगांमधील आपली मालकी विकण्याचा सपाटाच लावला आहे. भारत पेट्रोलियमनंतर आता सरंक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या मिश्र धातू निगम लिमिटेडचे (मिधानी) दहा टक्के शेअर्स विकणार असल्याचे समोर आले आहे.
संरक्षण क्षेत्र, अणुऊर्जा आणि अंतराळ क्षेत्राशी संबंधित उद्योगांना आवश्यक असलेले स्टील बनवण्याचे काम मिधानीकडून केले जाते. 2018 मध्ये शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या या सरकारी कंपनीच्या प्रति शेअरची किंमत सध्या 193 रुपये एवढी आहे. त्यानुसार आपल्याकडे असलेल्या मालकीपैकी दहा टक्के विकल्यास सरकारला 360 कोटी रुपये मिळू शकणार असल्याचे मिधानिशी संबंधित अधिकाऱयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात 74 टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली. त्यानुसार आतापर्यंत जवळपास 50 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक संरक्षण क्षेत्रात झाली आहे. याआधी सरकारला मिधानीच्या 26 टक्के आयपीओच्या विक्रीतून 438 कोटी मिळाले आहेत.























































