
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मुंबईतील सर्व मॉलची झाडाझडती घेऊन तब्बल 29 मॉलना नोटीस बजावल्या. मात्र संबंधित मॉलवर कोणतीही कारवाई केली नसल्याने मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा नसलेल्या मॉलना केवळ नोटीस कसल्या देता, तातडीने टाळे लावा अशी जोरदार मागणी स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी केली. यावेळी अग्निशमन दलाने तातडीने कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्टोबरला लागलेली आग नियंत्रणात येण्यास तब्बल 56 तास लागले होते. बंद असलेली अग्निशमन यंत्रणा आणि बेकायदा बांधकाम यामुळे आग जास्त वेळ भडकली असल्याचे आरोप स्थायी समितीत करण्यात आले. या आगीबाबत स्थायी समितीत तीन वेळा सादर केलेल्या अहवालावर असमाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्षांनी मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईतील सर्व 76 मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली. यामध्ये अग्निसुरक्षेकडे त्रुटी असणाऱया 29 मॉलना नोटीस बजावण्यात आली, मात्र संबंधित मॉलवर कारवाई केली नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार, असा सवाल करून मॉल बंद करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. अग्निशमन यंत्रणा नसलेल्या मॉलच्या दर्शनी भागावर ‘अग्निशमन यंत्रणा नाही, ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारीवर खरेदीला आत जावे’ असे बोर्ड लावावेत अशी मागणी केली.
‘अट्रीया मॉल’ प्रकरणात 48 तासांत स्पष्टीकरण
वरळीतील ’अट्रीया मॉल’ला स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचनेनुसार अग्निशमन यंत्रणा तपासणी करीत असल्याची नोटीस पालिका प्रशासनाने दिल्याचा गंभीर प्रकार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उघड केला. प्रशासनाच्या या भूमिकेचा सर्वपक्षीयांनी निषेध करीत अधिकाऱयाच्या निलंबनाची मागणी केली. सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, ’सपा’चे रईस शेख, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर यांनीदेखील कारवाईची मागणी केली. या प्रकरणी 48 तासांत चौकशी करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.























































