अमरावती – बेपत्ता झालेल्या बाळाचा मृतदेह विहिरीत आढळला, हत्येचे रहस्य अद्याप कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रभात कॉलनी येथील दीड महिन्याच्या मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी त्याच्याच घरातील विहिरीत आढळून आला. रविवारपासून बेपत्ता झालेल्या या बाळाच्या हत्येचे नेमके रहस्य आणखी गडद झाले आहे.

रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रभात कॉलनी येथील धैर्यसिंह नामक नवजात बालकाचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धैर्यसिंहचे आजोबा दिलीपसिंह चव्हाण यांच्या घरातूनच रविवारी दुपारी दीड वाजता हे नवजात बालक बेपत्ता झाले होते. धैर्यसिंहचे वडील अमरावती ग्रामीण पोलिसात कार्यरत आहेत.

चव्हाण यांच्याकडे एका नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे संपूर्ण कुटुंबच रविवारी दुपारी 12 वाजता बाहेर गेले होते. या दरम्यान बालकाचे अपहरण झाले. या संदर्भात पोलिसांनी चौकशीसाठी श्वान पथक बोलावले. त्यावेळी श्वानपथक घरातीलच विहीरीपर्यंत गेले होते. यावरून धैर्यसिंहला विहिरीत टाकले असावे असा संशय पोलिसांना आला.

अशातच सोमवारी सकाळी धैर्यसिंहचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. धैर्यसिंहची हत्या नेमकी कुठल्या कारणाने करण्यात आली हे अद्याप बाहेर आले नसले तरी त्यांच्या घरातील सदस्यावर सध्या संशय व्यक्त करण्यात येत आहे.