
>> दिलीप जोशी
बऱ्याच वर्षांपूर्वी दोन दिवसांच्या पक्षी संमेलनात सहभागी झालो होतो. त्याला पत्रकारी संदर्भ होता. मात्र त्या संमेलनातली पक्षीतज्ञांची अभ्यासपूर्ण भाषणं आणि पक्षीपेमींचा उत्साह पाहून या विषयाची आवड निर्माण झाली. त्यावेळी मिळणाऱया कॅमेऱयांपैकी एक बऱयापैकी कॅमेरा घेऊन आमच्या राजावाडीतच आढळणाऱया पक्ष्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईत रेल्वेकिनारी वसलेली आमची वस्ती तेव्हा कमालीची निसर्गरम्य होती. आजही तिथे हिरवाई दिसते, पण त्यावेळी वड, चिंच, पिंपळ अशा महाकाय झाडामाडांची दाटी होती. सात-आठ प्राचीन बांधील विहिरी होत्या. आमच्या टुमदार घरासमोर तर मोटेच्या पाण्यावर फुललेला पालेभाज्यांचा मळा होता आणि एक बारमाही स्वच्छ पाण्याचा ओढा जवळूनच वाहत होता. काळाच्या ओघात आता सारं बदललंय, पण त्या काळातल्या दुर्मिळ फोटोंमध्ये काही झाडं आणि पक्षीही नोंदले गेले आहेत.
हे आठवण्याचं कारण म्हणजे आता ‘अस्मानी पाहुण्यांचा’ मोसम आपल्याकडे सुरू झालाय. दूरवरून हजारो मैलांवरून येणारे काही अगदी इवलेसे आणि काही महाकाय पक्षी ऋतुमानानुसार सुखद निवारा शोधण्यासाठी जे स्थलांतर करत असतात, त्यात हिंदुस्थानात स्थलांतरित पक्षी येण्याचा काळ सध्याचा आहे.
उत्तर धुवीय प्रदेशात आणि त्याच्या आसपासच्या देशात सूर्याच्या दक्षिणायनापासून हिवाळय़ाची चाहूल लागते. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत तर उत्तर हिंदुस्थानापर्यंत कडक हिवाळा असतो. अशावेळी ‘उबदार’ थंडीच्या शोधात असणारे पक्षी अनेक कारणांनी स्थलांतर करतात. हा त्यांचा वार्षिक सामूहिक कार्यक्रम शेकडो वर्षे सुरू आहे. त्यांच्याकडे वार्षिक ‘प्लॅनर’सारखं कॅलेंडर नसतं, कोणतीही आधुनिक ‘गॅझेट्स’ दिशादर्शनासाठी नसतात आणि तरीही ‘बॅब्लर’सारखा अवघ्या पाच-सहा ग्रॅम वजनाचा चिमुकला सुंदर पक्षी आपल्या पंखातलं बळ एकवटून हजारो किलोमीटरचं हवाई अंतर कापत थेट सायबेरियातून आपल्याकडे येतो.
पक्षी जीवनाविषयी अभ्यास करायचा तर आपल्याकडचे ऋषीतुल्य पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचं संशोधनात्मक आणि आता पुस्तकरूपाने उपलब्ध असलेलं साहित्य प्रत्येकाने जरूर वाचावं. एका वेगळय़ाच विश्वात ते आपल्याला घेऊन जातं. त्यांचं ‘फॉल मॉफ स्पॅरो’ हे हृदयस्पर्शी आत्मकथन आणि ‘इंडियन बर्डस्’ ही पुस्तकं संग्रही असल्याने सतत पक्षी जीवनाविषयी जागृत ठेवतात. मुंबईत त्यांना पाहण्याचा योग अनेकदा आला. ते आणि त्यांच्या सहकाऱयांचं या क्षेत्रातलं कार्य दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे.
एका लेखात डॉ. सलीम अलींचं एक अभ्यासपूर्ण पक्षीनिरीक्षण नोंदलं होतं. ‘राखाडी परीट’ (ग्रे हेरॉन) हा पक्षी मुंबईतल्या एका खेळाच्या मैदानावर सतत पाच वर्षे सप्टेंबर महिन्यात येताना त्यांना आढळला होता. तोसुद्धा विशिष्ट तारखेला! पक्ष्यांच्या मेंदूतील ‘कंपास’ आणि ‘घडय़ाळ’ याची नैसर्गिक ऊर्मी यातून सिद्ध होते. गुजरातमधील काठेवाडच्या एकाच जागी वटवटय़ा पक्षी (वॅगटेल) 2 हजार मैलांचं अंतर पार करून दरवर्षी कसा यायचा हे एका पक्षीमित्राने सांगितलं होतं.
पक्ष्यांचं स्थलांतर आणि माणसांचं स्थलांतर यात फरक आहे. माणसाला निसर्गानुकूल घरं तो राहतो तिथेच बांधता येतात, पण पक्ष्यांना निसर्ग अनुकूल असेल तिकडे जावं लागतं. माणसांचं स्थलांतर अनेकदा कायमचं असतं. पक्षी मंडळी मात्र त्यांचं जैविक कार्य आणि गरज संपली की, पुन्हा परत जातात. हजारोंच्या थव्याने आकाश पेलत ते हजारो मैल उडत येतात आणि तसेच परत जातात. अर्थात गेल्या काही दशकांत त्यांनाही विविध प्रकारच्या प्रदूषणाचा फटका बसतोय. जगभरच्या सर्व सजीवांना त्रासदायक ठरणारं प्रदूषण फक्त माणूस नावाचा प्राणीच निर्माण करतो. आता नियोजित अमेरिकन अध्यक्ष नव्याने पर्यावरणपूरक ‘पॅरिस करारा’चे पालन करणार आहेत म्हणे. तसं झालं तर आनंदच आहे.
सुमारे 400 ते 900 मीटर उंंचीवरून उडणारे पक्षी थव्याने स्थलांतर करतात. तसे ‘फ्लेमिंगो’ आता मुंबईतही दिसतील. गुजरात, राजस्थानातील भरतपूर येथे तर अशा पक्ष्यांची जत्राच भरते. यंदा ते न्याहाळण्याचं पर्यटन शक्य नसले तरी पुढच्या वर्षांसाठी अभ्यास करून ठेवूया. एव्हरेस्ट विजेते एडमन्ड हिलरी यांना तर काही पक्षी हिमालयात आठ हजार मीटर उंचीवरून उडताना आढळले होते. कुठून येतं त्यांच्या पंखात एवढं बळ! निसर्गाशी सख्य करून जगण्याच्या त्यांच्या जीवन पद्धतीतून येत असावं. त्यांच्याकडून आपणही बरंच शिकू शकतो. अशा वेळी… कॅमेऱयाने पस्तीस वर्षांपूर्वी ‘टिपलेल्या’ हुदहुद (हुप्पू) या तुर्रेदार पक्ष्याचा गजबजलेल्या मुंबईतून घेतलेला फोटो समोर आहे. त्यावेळचा रंगीत एकेकाळचा तो फोटा आता थोडा ‘फिकट’ झालाय, पण पक्ष्यांच्या आठवणी मनात तितक्याच ठसठशीत ताज्या आहेत.





























































