
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी आज मतदान पार पडले. कोरोनाच्या संकटावर मात करीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 82. 91 टक्के मतदान झाले. येत्या 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.
राज्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात तसेच नागपूर पदवीधर, संभाजीनगर पदवीधर व अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच मतदारसंघात मतदान झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा थेट सामना या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगला आहे. कोरोनाच्या संकटामुळे मतदानाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पण कोरोनाचे संकट असूनही चांगले मतदान झाले असे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले.
फडणवीस शाई लावण्यास विसरले
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून थेट नागपूर गाठले आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यावर ते मतदान कक्षातून बाहेर पडले. पण मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्यास विसरले होते. ही चूक त्यांच्या लक्षात आल्यावर ते पुन्हा मतदान कक्षात गेले आणि बोटावर शाई लावली.





























































