
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात उत्साहात व शांततेत मतदान झाले. दुपारी चार वाजेपर्यंत ‘पदवीधर’साठी 49.35 टक्के, तर ‘शिक्षक’साठी 74.36 टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान झाले.
पुणे विभागात उमेदवारांची गर्दी होती; परंतु महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. या उमेदवारांसाठी दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लागली. गेले काही दिवस शिक्षक, पदवीधरांचे मेळावे, भेटीगाठी या माध्यमातून वातावरण ढवळून निघाले होते. दोन्ही मतदारसंघांत अन्य पक्ष व काही अपक्ष उमेदवारांनी जोर लावून रणधुमाळीत रंगत आणल्याचे चित्र होते.
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मतदानाला वेग आला. दुपारी वेग काहीसा मंदावला; पण शेवटच्या टप्प्यात पुन्हा मतदानाला गती आली. विशेषतः शिक्षक मतदारसंघात सर्व पक्ष-संघटनांनी जोर लावल्याने मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात ‘पदवीधर’साठी दुपारी 12 पर्यंत 20.23 टक्के, दुपारी 4 वाजेपर्यंत 49.35 टक्के, शिक्षक मतदारसंघासाठी दुपारी 12पर्यंत 31.34 टक्के, दुपारी 4 वाजेपर्यंत 74.36 टक्के इतके मतदान झाले.
‘पदवीधर’साठी जिह्यात 59 हजार 70, तर ‘शिक्षक’साठी 7 हजार 710 इतके मतदार नोंदविले गेले होते. दोन्हीसाठी अनुक्रमे 132 व 44 मतदान केंद्रांची व्यवस्था होती.
चंद्रकांत पाटलांचे मास्क न घालता मतदान
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी कोरोनाच्या नियमावलीत सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मास्क, सॅनिटायझर, तसेच सुरक्षित अंतराचे पालन करीत पदवीधर व शिक्षक मतदार मतदान करताना दिसत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनीही या नियमांचे पालन करीत मतदान केले. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मास्कशिवाय मतदान केंद्रात जाऊन मतदान केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का केली नाही, असा सवाल विचारला जात होता.
अभिजित बिचुकले पुन्हा एकदा ‘चुकले’!
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत दोन्ही जागा लढविण्यासाठी मैदानात उतरलेले ‘मराठी बिग बॉस’फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा ‘चुकले’! मतदारयादीतच नाव नसल्याने उमेदवार असूनही त्यांना मतदान करता आले नाही. याचे खापर प्रशासनावर फोडून त्यांनी आपला संताप व्यक्त केला; पण त्यांनी मतदार नोंदणीसाठी अर्जच दाखल केला नसल्याचे सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांनी मतदारयादीत नाव नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. परंतु उमेदवाराचे नाव, राज्य विधानसभेच्या मतदारयादीत असणे अनिवार्य आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी म्हटले आहे.
सांगली जिह्यात मतदानाची चुरस
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाले. सांगली जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 64.60 टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी 81.43 टक्के मतदान झाले.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यातीलच दोन उमेदवारांत मोठी चुरस पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत होती. या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने अरुण गणपती लाड, तर भाजपच्या वतीने संग्रामसिंह देशमुख या दोघांत लढत होत आहे.
जिल्ह्यात एकूण 143 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळत होती. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांनी पलूस मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला, तर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनीही सकाळी कडेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. सकाळी 10 वाजेपर्यंत अवघ्या दोन तासांत आठ टक्के मतदान झाले. मात्र, त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पलूसमधील भिलवडी मतदान केंद्रावर सौम्य लाठीमार
जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता; परंतु पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी होऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेत सौम्य लाठीमार करीत गर्दी पांगवली. यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली. त्यामुळे पुन्हा शांततेत मतदान पार पडले.
दोन पारंपरिक विरोधकांची ‘चाय पे चर्चा’
कडेगाव येथे मतदानाचा हक्क बजावून भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख बाहेर पडत असतानाच राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम तेथे आले. दोघांनी संवाद साधत नजीकच्या कार्यकर्त्याच्या घरी चहा घेतला. या दोन पारंपरिक विरोधकांच्या भेटीने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेला विराम देत राज्यमंत्री डॉ. कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यासमवेत अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी पलूस, तर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
पदवीधर, शिक्षक मतदारांची सोलापूर जिल्ह्यात गर्दी
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी सोलापूर जिल्ह्यातील एकूण 197 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान झाले. ‘पदवीधर’साठी एकूण 62.47 टक्के, तर शिक्षक मतदारसंघात 85.37 टक्के मतदान झाले होते. शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला, नार्थकोट प्रशालेसह अनेक ठिकाणी मतदारांची गर्दी दिसून आली.
सोलापुरात पदवीधर मतदारसंघातील 123 केंद्रांवर मतदान सुरू होते. 53,813 मतदारांपैकी 33,399 मतदारांनी मतदान केले होते. शिक्षक मतदारसंघासाठी 74 मतदान केंद्रांवर 13,584 मतदारांपैकी 11,596 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. अनेक मतदान केंद्रांवरी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दी नियंत्रणात आणली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची कुरबूर वाढल्यामुळे दुपारनंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
सोलापूर शहरातील विविध मतदान केंद्रांवर महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, एमआयएमचे आरिफ शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक विनोद भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, रियाजभाई शेख, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश कदम यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.






























































