
एका अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला़ त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरले़ एका पायावर स्वतःचा तोल सावरत ते जेव्हा पटापट माडावर चढतात तेव्हा पाहणार्यांची नजर हटत नाही़ त्यांनी निवडलेले हे उत्पन्नाचे साधन भलेही त्यांचा पूर्ण खिसा भरत नाही, पण समोरच्याच्या मनात मात्र त्यांचे काम नक्कीच भरते. याच कष्टावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हा कल्पवृक्षच त्यांना जगण्याचा मार्ग दाखवत आहे आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या तुरळ गावातील श्रीपत जवरत यांनी झाडावर चढण्याच्या कलेला जोपासतच त्यातून आपल्या व्यवसायाचा मेळ घातला आहे. एक पाय गमवावा लागला तरी त्याच झाडावर चढण्याच्या कलेने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला आहे. गावात तसेच आजूबाजूच्या परिसरातील मंडळीही त्यांना नारळ काढण्यासाठी आवर्जून बोलवतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यातही दिव्यांग व्यक्तींचे जगणे खूप संघर्षमय असते. दिव्यांग हा शब्दच आपल्याला बरेच काही सांगून जातो. परिस्थितीशी झगडत, त्यावर मात करत अनेक दिव्यांगांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच एका दिव्यांग बांधवांपैकी एक आहेत श्रीपत जवरत.
श्रीपत एका पायाच्या जोरावर उंच झाडांवर पटापट चढतात. मग ते झाड कोणतेही असो. एकाच पायाच्या सहाय्याने नारळी साफ करुन हा अवलिया आपल्या कुटुंबाला सांभाळतो. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर श्रीपत यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
गेली 40 वर्षे श्रीपत जवरत झाडावर चढण्याची कला जोपासत आहेत. श्रीपत यांना केवळ आसपासच्या भागातूनच नाही तर जिल्ह्याच्या अनेक भागातून झाडे साफ करण्यासाठी बोलावणे येते. योग्य मोबदल्याच्या बदल्यात ते संबंधितांकडे कामाला जातात. सध्या श्रीपत यांनी वयाची साठी ओलांडली आहे. पहिल्यासारखे शरीर त्यांना साथ देत नाही, पण तरीही त्यांचे काम अविरत सुरूच आहे.
श्रीपत यांच्या लहानपणी गावांगावांमध्ये वीजेचे खांब बसवण्याचे काम सुरू झाले होते. त्याकरता त्यांच्या गावात वायर खेचण्याचे काम सुरू होते. श्रीपत त्यांच्या काही मित्रांसोबत खेळण्यासाठी म्हणून तिथे गेले. लहानपणापासून झाडावर चढण्याची आवड असल्याने ते विजेच्या खांबावर चढले. त्यावेळी पायाचा स्पर्श विजेच्या तारांना झाला. सुरूवातीला विद्युत प्रवाह सुरू नव्हता. अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि ते त्याठिकाणी जवळपास दोन तास चिकटून राहिले. बांबूच्या सहाय्याने त्यांना बाजूला करून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले पण त्याला फार उशीर झाला होता. त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला.
पाय गमावूनही मोठ्या उमेदीने त्यांनी झाडावर चढण्याचा सराव सुरूच ठेवला. हळूहळू त्यांना परिसरातून किंवा अगदी लांबच्या ठिकाणाहूनदेखील नारळी साफ करण्यासाठी बोलावणे येऊ लागले. आता श्रीपत बिनधास्तपणे कोणत्याही आणि कितीही उंच झाड असले तरी त्यावर चढतात. त्या झाडाची साफसफाई करतात. श्रीपत दिव्यांग असल्याने त्यांचे लग्न होऊ शकले नाही, मात्र त्यांच्या कुटुंबियांना कधीच त्यांचे ओझे वाटले नाही. ते मेहनत करतात. त्यांच्या कमाईचा हिस्सा ते घरच्यांना देतात. जी गोष्ट त्यांना करणे शक्य नाही त्या गोष्टींमध्ये त्यांना घरची मंडळी मदत करतात. श्रीपत यांच्या जिद्द आणि चिकाटीचा आदर्श घेत त्यांचे भाऊ, पुतणे आणि अन्य कुटुंब सदस्य आज मार्गक्रमण करीत आहेत.



























































