
‘जलयुक्त शिवार’ अभियानासंदर्भात ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर चौकशी लावण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नगर-मनमाड महामार्गाची अवस्था पाहून मला लाज वाटते, अशा शब्दांत त्यांनी या रस्त्याबद्दल खंत व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानाच्या चौकशीसंदर्भात सूडबुद्धीचा विषय नाही. ‘कॅग’ने दिलेल्या अहवालानुसार याची चौकशी लावण्यात आलेली आहे. भाजपने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.
नगर-मनमाड महामार्गाची अवस्था दयनीय झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. मला लाज वाटते, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. निधीची कमतरता आहे. मात्र, याला मागील मंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत. त्यांच्या काळापासून हे रस्ते खराब झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
आता पीडब्ल्यूडी विभागाला निधी वितरणामध्ये सुरुवात होईल व लवकरच रस्ते तयार केले जातील, असे त्यांनी सांगितले.
सध्या बिबटय़ाचा त्रास मोठय़ा प्रमाणात वाढत चालला आहे. याबाबतचा आढावा घेतला असून, नगर जिल्ह्यात 550पेक्षा जास्त बिबटे असल्याचे वन खात्याचे म्हणणे आहे. यासाठी आता नागरिकांना जी मदत लागेल, ती तत्काळ दिली जाईल.
बिबटय़ाचा त्रास असलेल्या भागातील शेतकऱयांना त्यांच्या मागणीनुसार वीज द्यावी, यासाठी ऊर्जामंत्री राऊत यांच्याशी बोलणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
शिर्डी संस्थानच्या आवाहनाचा वेगळा अर्थ काढू नये
शिर्डी संस्थानने पारंपरिक कपडे घालून येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत तेथील पदाधिकाऱयांशी चर्चा झाली आहे. हा विषय ऐच्छिक असून, शिर्डी संस्थानने केवळ आवाहन केले आहे. त्यासंदर्भात इतरांनी त्याचा वेगळा अर्थ काढू नये,’ असेही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.





























































