कोरोनापेक्षा टीबीचा विळखा घातक, राज्यात सध्या 1 लाख 69 हजार टीबी पेशंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश चुरी । मुंबई

  • सहा वर्षांत 11 लाख लोकांना टीबीची लागण
  • टीबीच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
  • युवकांना टीबीचा धोका अधिक
  • हवेतून पसरत असल्याने संसर्गाचा धोका जास्त
  • राज्यात महिनाभर टीबी शोध अभियान
  • परळ, दादर, कुर्ला, शीवमध्ये टीबी पेशंट अधिक

 

संपूर्ण महाराष्ट्राने कोरोनाचा धसका घेतला असला तरी कोरोनापेक्षा टीबी अधिक घातक असल्याचे पुढे आले आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 90 हजारांच्या आसपास आहे. मात्र आजच्या घडीला मुंबईसह संपूर्ण राज्यात टीबी पेशंटची संख्या 1 लाख 69 हजारांच्या आसपास आहे.

कोरोनाचा धोका ज्येष्ठांना अधिक असल्याचे सांगण्यात येते, मात्र 15 ते 30 वयोगटातील तरुणांना टीबीचा धोका अधिक असून या वर्षभरात तब्बल 53 हजार 883 युवकांना टीबीची लागण झाल्याचे पुढे आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने 1 डिसेंबरपासून राज्यभरात क्षय व कुष्ठरोग शोधमोहीम हाती घेतली आहे.

केंद्र सरकार दरवर्षी कुष्ठरोग मोहीम सर्व राज्यांत राबवते, पण राज्य सरकारने पुढाकार घेऊन या मोहिमेला टीबी शोधमोहिमेची जोड दिली आहे. कारण कोरोनामुळे टीबी रुग्णांच्या उपचारांवर परिणाम झाला.

सरकारी रुग्णालयांत ओपीडीमध्ये 100 रुग्ण येत असतील तर कोरोना काळात वीसच रुग्ण येत होते. अनेक खासगी डॉक्टरांनी सेवा बंद केली होती. त्यामुळे टीबी शोधमोहीम सुरू केली आहे.

शरीराच्या प्रमुख अवयवांवर हल्ला

मुंबईसारख्या दाटीवाटीने वसलेल्या शहरांना टीबीचा धोका अधिक आहे. कारण हा हवेतून पसरणारा रोग असल्याने अधिक घातक आहे. हा प्रामुख्याने फुप्फुसांना होत असला तरी शरीराच्या लसिकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंडाला होतो.

कसा पसरतो

फुप्फुसाला टीबीचा संसर्ग झालेला रुग्ण जेव्हा शिंकतो किंवा खोकतो तेव्हा हवेद्वारे  प्रसार होतो.

कोणाला धोका अधिक

एचआयव्ही पेशंट, कुपोषित व्यक्ती, मधुमेह व धूम्रपान करणारी व्यक्ती

टीबीची आकडेवारी

राज्यातील रुग्ण :  1 लाख 33 हजार 125

मुंबईतील रुग्ण : 36 हजार 700

राज्यात दरवर्षी टीबीने मृत्यू : 8 हजार 423

मुंबईत दरवर्षी टीबीने मृत्यू : 1 हजार 750

राज्यात दररोज टीबीने मृत्यू : 23,

मुंबईत दररोज टीबीने मृत्यू  : 5

 

टीबी व कुष्ठरोग हे दोन्ही अतिशय संसर्गजन्य आहेत. कोरोनापेक्षा अधिक घातक आहे. कोरोनापेक्षा टीबीने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देशात अधिक आहे. टीबीचे अचूक व लवकर निदान करण्यासाठी घरोघरी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकांनी स्वतःहून पुढे येऊन लक्षणे सांगावीत. – राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री