
माहीम, प्रभादेवी आणि वरळीकरांना पाणीपुरवठा करणाऱया तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे बुधवार आणि गुरुवारी हाती घेण्यात आलेले काम 12 तास आधीच पूर्ण झाले असून एकूण पाच ठिकाणची गळती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे माहीम, प्रभादेवी, वरळीतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
कोरोनाच्या काळातही मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे. ‘जी-दक्षिण’ आणि ‘जी/उत्तर’ विभागाला पाणीपुरवठा करणारी ब्रिटिशकालीन 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनीची मोठी दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्यातील गळती दुरुस्ती पथकाने बुधवार, 2 आणि गुरुवार, 3 डिसेंबरला अहोरात्र मेहनत करून मुदतीच्या 12 तास आधीच पूर्ण केले. वरळीमधील दीपक सिनेमाजवळ गावडे चौकाखाली जलवाहिनीच्या दुरुस्तीचे आव्हानात्मक काम करताना एकूण 5 ठिकाणी असलेली गळती बंद करण्यात आली. यामुळे आता लाखो लीटर पाण्याची बचत होणार आहे. दुरुस्तीचे काम वेळेच्या आत व काैशल्याने पार पाडल्याबद्दल पथकातील अधिकारी–कर्मचारी यांचे महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी काैतुक केले आहे.
जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करताना त्यावर दोन मॅनहोल लावण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात जलवाहिनी दुरुस्ती करावी लागली तर मोठे खोदकाम न करता तसेच वाहतुकीस अडथळा न येता या मॅनहोलद्वारे आत जाऊन दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.






























































