
यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेत वापरण्यात आलेला चाकू जप्त केला असून, शवविच्छेदन अहवालही प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज दिली.
रेखा जरे यांची सोमवारी (दि. 30) रात्री आठ वाजता धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे, ऋषीकेश पवार या पाच आरोपींना अटक केलेली आहे. या आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
या हत्येची सुपारी बोठे व भिंगारदिवे यांनी दिल्याचे तपासात समोर आले आहे. बोठे हा तीन दिवसांपासून फरार आहे. पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना अजून धागेदोरे मिळालेले नाहीत. पोलिसांनी दोन वेळा त्याच्या घराची झडती घेतली. काल घेतलेल्या झडतीत त्याच्या घरातून त्याचे परवाना असलेले पिस्तूल ताब्यात घेण्यात आलेले आहे.
मुख्य आरोपीच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत. जिह्याच्या बाहेरसुद्धा पथके रवाना केली आहेत. तपास प्रगतिपथावर असून, या घटनेत आरोपींनी वापरलेला चाकू हस्तगत केला आहे. रेखा जरे यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे अद्यापि पुढे आलेले नाही.
– मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर.
बोठेची सगळी वाहने घरीच
बोठे याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्याची वाहने घरीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने फरार होण्यासाठी इतर वाहनांचा वापर केल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
दरम्यान, जरे यांच्या गाडीमध्ये असलेल्या महिला व बालकल्याणच्या अधिकारी विजयमाला माने यांचेसुद्धा जबाब पोलिसांना घ्यायचे आहेत. मात्र, आज त्यांचा शोध लागला नाही. सागर भिंगारदिवे याच्या केडगाव येथील घराची पोलिसांनी झडती घेतली आहे.





























































