
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱया दलालांविरोधात जोरदार मोहिम राबविली असून एकटय़ाने प्रवास करणाऱया महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अभियान राबविले आहे.
कोविड काळात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वे तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व महिला प्रवाशांच्या संरक्षणासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीत स्पेशल आरक्षित गाडय़ा चालवण्यास सुरुवात केली आहे. या विशेष गाडय़ांमधील तिकीटे पर्सनल युजर आयडी वापरुन बेकायदेशीरपणे आरक्षित केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तिकीट दलालांविरोधात मोहिम राबविण्यात आली.
मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने तातडीने कारवाई करीत सायबर सेलकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे व इतर गुप्त माहितीनूसार धाडसत्र आरंभिले. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत हे छापे टाकण्यात आले. त्यातील बहुतांश छापे खासगी ट्रव्हल एजन्सींवर टाकण्यात आले. त्यात नोव्हेंबर 2020 पर्यंत रेल्वे कायद्याच्या कलम 143 अन्वये तिकीट दलालीचे 174 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय महिला प्रवाशांना विशेषतः एकटय़ाने प्रवास करताना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने नुकतीच ‘मेरी सहेली’ ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत, आरपीएफचे पथक दैनिक व साप्ताहिक विशेष गाडय़ांसह सरासरी 25 गाडय़ांमधून महिला प्रवाशांना संरक्षण देण्यासाठी ही मोहिम राबवित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



























































