वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, दोघे भावंडे अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघा भावडांना सहकारनगर पोलिसांनी अटक केले. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल चौकात घडली.

विनायक सर्जेराव पोळ (वय 32 रा. किरकटवाडी ) आणि नरेंद्र सर्जेराव पोळ (वय 32 रा. आंबेगाव पठार)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक राहूल गोसावी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल गोसावी काल सकाळी सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्या विनायकला त्यांनी थांबविले. त्यावेळी त्यांच्या मोटारीत तिघांनी मास्क घातले नव्हते. त्याबाबत विचारणा केली असता, दोघा भावडांसह मोटारीतील एका महिलेने राहूल यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बुनगे तपास करीत आहेत.