
कोल्हापूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना दिलेले कार्यमुक्तीचे आदेश तातडीने मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जि. परिषदेचे मुख्य कार्य. अधिकारी अमन मित्तल यांना दिल्या. तसेच आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडविण्याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.
कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेसाठी प्रतिरुग्ण 50 रुपये मोबदला कमी असल्याने आशा स्वयंसेविकानी हा सर्व्हेच नाकारला होता. त्यामुळे मुख्य कार्य. अधिकारी मित्तल यांनी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या आशा स्वयंसेविकानी सिटू अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कैफियत मांडली.
यावेळी काॅ. चंद्रकांत यादव, कॉ.भरमा कांबळे, कॉ.शिवाजी मगदूम, आशा युनियनच्या उज्वला पाटील, संगीता पाटील, सारिका पाटील, मंदाकीनी कोडक, माया पाटील, मनीषा पाटील आदी आशा स्वयंसेविका संख्येने उपस्थित होत्या.
सन 2019 चा महापूर, महाआयुष, माझं कुटुंब- माझी जबाबदारी, आयुष्यमान भारत या सर्व योजनांमध्ये सर्व्हेचे काम करूनही मानधन मिळाले नसल्याची कैफियत आशा स्वयंसेविकानी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मांडली. यावर तातडीने आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांना फोन करून या मानधनाबाबत मुश्रीफ यांनी स्वत: विचारणा केली. त्यावेळी व्यास यांनी लवकरच हे पैसे वर्ग करून हा प्रश्न निकालात काढण्याची ग्वाही व्यास यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिली.




























































