
21 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याने हिंदुस्थानविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी आत्मविश्वास कमवला. सिडनी येथे सुरू असलेल्या इंडियन्स संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात कॅमरून ग्रीनने नाबाद 114 धावांची खेळी साकारत पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघातील स्थान जवळपास पक्के केले. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱया दिवसअखेरीस पहिल्या डावात 8 बाद 286 धावा फटकावल्या आहेत.
इंडियन्स संघाकडून उमेश यादव, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांसह रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजाने चमक दाखवली. इंडियन्स संघाने सोमवारी पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत दहा धावांची भर घातली. इंडियन्स संघाने 9 बाद 247 या धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. यानंतर उमेश यादव, मोहम्मद सिराज व रविचंद्रन अश्विन यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघाची अवस्था 5 बाद 98 धावा अशी झाली होती.
पण कॅमरून ग्रीनने तळाच्या फलंदाजांसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करीत ऑस्ट्रेलियन अ संघाचा डाव सावरला. त्याने 1 षटकार व 10 चौकारांसह 114 धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्याला निक मॅडीनसन (23 धावा), टीम पेन (44 धावा), मायकेल नेसर (33 धावा) यांची उत्तम साथ लाभली. इंडियन्स संघाकडून उमेश यादवने 44 धावा देत तीन, मोहम्मद सिराजने 71 धावा देत दोन आणि रविचंद्रन अश्विनने 58 धावा देत दोन फलंदाज बाद केले.




























































