लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटना – कॅटरिंग व्यावसायिकाच्या आचाऱ्याचा मृत्यू, 9 गंभीर, तिघांची प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबागमध्ये रविवारी सकाळी लग्नघरात घरगुती गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या आचाऱयाचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्या आधी आठ वाजता एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. या दुर्घटनेत 16 जण होरपळले. त्यात 9 जणांची प्रकृती गंभीर असून तिघांची प्रकृती स्थिर आहे.

लालबागमध्ये रविवारी सकाळी साडेसातला गणेश गल्लीजवळची साराभाई ही तीन मजली इमारत घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरली. कॅटरिंग व्यावसायिक मंगेश राणे यांची मुलगी पूजा हिचे लग्न 9 डिसेंबरला असल्याने त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी येणाऱया नातेवाईकांसाठी जेवण्या-खाण्याची व्यवस्था सुरू असताना सकाळी गॅस गळती होऊन हा स्फोट झाला. यात मंगेश राणे (61), त्यांचा मुलगा यश (19) आणि त्यांचा आचारी करीम (45) यांच्यासह 16 जण जखमी झाले होते. स्फोटावेळी करीम होरपळून बाहेर फेकले गेले. फेकले गेल्यामुळे भिंतीवर आपटून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.