
काँग्रेसचा मुंबई अध्यक्षपदाची निवड लवकरच होणार असून यासाठी आता ऑनलाइन कॉलिंगद्वारे नावाची चाचपणी केली जात आहे. 227 ब्लॉक अध्यक्षांना महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या आवाजातील कॉल करण्यात आला आहे. ब्लॉकअध्यक्षांनी मुंबई अध्यक्षपदासाठी कॉलवर कुणाचे नाव सुचवले हे सध्या तरी गुलदस्त्यात असले तरी एच. के. पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी सुचविलेल्या नावालाच ब्लॉक अध्यक्षांनी पसंती दर्शविल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर अखेरपर्यंत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाची निवड होणार आहे. मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीबाबत एच. के. पाटील यांनी काँग्रेसचे खासदार, आमदार तसेच नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी कोण योग्य असेल याबाबत चर्चा केली होती. या चर्चेत अमरजित मनहास यांच्या नावला सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली होती.
त्यांच्याबरोबरच कामगार नेते भाई जगताप यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. त्याचप्रमाणे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजीत सप्रा, मधू चव्हाण यांचीही नावे चर्चेत आहेत. एच. के. पाटील यांनी मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीबाबत तीन वेळा मुंबईत चाचपणी केली आहे. त्यानंतर आता 227 ब्लॉक अध्यक्षांना एसएमएसवरून चाचपणी केली जात आहे.
एसएमएसवर एका नंबरवरून कॉल येईल असे सांगण्यात येऊन त्याकडे लक्ष देऊन सूचनांचे पालन करा असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित नंबरवरून एच. के. पाटील यांच्या अवाजातील कॉल जाऊन या ब्लॉक अध्यक्षांना मुंबई अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीचे नाव सांगण्यास सांगितले जात आहे. 227 ब्लॉक अध्यक्षांनी यासंदर्भात आपल्या पसंतीचे नाव या कॉलवर नोंदवले आहे. यातील बहुतांशी ब्लॉक अध्यक्षांनी अमरजीत मनहास यांच्याच नावाला पसंती दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.























































