एक्प्रेस वेवर ‘ड्रोन’ भिरभिरणार, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना टोलनाक्यावर घेरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचे नियम मोडणाऱयावर आता महामार्ग पोलीस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनांची छायाचित्रे टिपली जातील. जेव्हा वाहने टोलनाक्यावर येतील तेव्हा त्या वाहनचालकावर कारवाई केली जाणार आहे. नवीन वर्षात हा उपक्रम राबवला जाणार आहे.

मुंबई-पुण्याला जोडणारा एक्स्प्रेस वे हा 95 किलोमीटर लांबीचा आहे. एक्सप्रेस वेवर दिवसाला हजारो वाहने ये-जा करत असतात. तेथे होणाऱया अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन, महिंद्रा आणि महिंद्राच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. एक्स्प्रेस वेवर ओव्हर स्पीडिंग, अचानक होणारी लेन कटिंग आणि अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने ही तेथे होणाऱया अपघातांची तीन प्रमुख कारणे आहेत. एक्सप्रेस वेवर 80 ची गतीमर्यादा आहे. तरीही काही चालक हे ओव्हर स्पीडिंगने वाहने चालवतात असे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

अपघात कमी करत बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग पोलीस आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन ड्रोनच्या मदतीने नजर ठेवणार आहेत. ड्रोनसाठी डीजीसीएची परवानगी घेतली जाणार आहे. महामार्ग पोलीस आणि सेव्ह लाइफचे एक वाहन सतत गस्त करणार आहेत. त्या वाहनातून ड्रोन ऑपरेट केले जाईल. अचानक लेन बदलणाऱया आणि ओव्हर स्पीडिंग करणाऱया वाहनचालकांचे फोटो काढले जातील. ती छायाचित्रे टोलनाक्यावर तैनात असणाऱया पोलिसांकडे पाठवली जातील. जेव्हा वाहने टोलनाक्यावर येतील तेव्हा बेशिस्त चालकावर कारवाई केली जाणार आहे.

तीन भाषांत करणार उद्घोषणा

एक्सप्रेस वेवर अनेक गाडय़ा अनधिकृतपणे उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे बहुतांश अपघातात होत असतात. त्यामुळे अनधिकृतपणे पार्क वाहने उभी करणाऱया चालकांनी तेथून वाहन काढावी यासाठी ड्रोनच्या माध्यमातून तीन भाषांत उद्घोषणा केल्या जाणार असल्याचे सेव्ह लाइफचे संस्थापक पीयुष तिवारी यांनी सांगितले.

एक्सप्रेस वेवर नियम मोडणाऱया चालकावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱया चालकांवर तत्काळ कारवाई केली जाईल. – डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक, महामार्ग पोलीस