पुण्यात शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी संपुर्ण हिंदुस्थानात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठा प्रतिसाद मिळून बंद यशस्वी झाला. व्यापारी महासंघाने उत्स्फुर्तपणे दोन तास व्यापारी पेठा बंद ठेवल्याने व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट होता. व्यापारी, कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्याने मार्केटयार्डातही शांतता होती. अनेक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा दुपारपर्यंत बंद ठेवल्याने रस्त्यांवर रिक्षांची संख्याही कमी होती. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह अनेक संस्था, संघटनांनी भाग घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.

पुणे बाजार समितीच्या मार्केटयार्डमधील सर्व कामगाaर संघटना, दी पूना मर्चंट्स चेंबर यांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतल्याने पुणे बाजार समितीची उलाढाल आज ठप्प झाली. गूळ-भुसार बाजारात कडकडीत बंद पाळण्यात आला. दररोज सुमारे 900 ते 1200 वाहनांतून शेतमालाची आवक होत असते. आज खरेदीदारांनी खरेदीकडे पाठ फिरविली. केवळ पाच टक्के खरेदीदरांनी खरेदी केली. त्यामुळे नेहमी गर्दी असणाऱया मार्केटयार्डमध्ये आज शुकशुकाट होता. पुणे शहरात टिळक चौकामध्ये महाविकास आघाडीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.