
शहरातील विविध भागात घरफोडीचे सत्र कायम असून चोरट्यांनी शिवाजीनगर आणि हिंगणे खुर्द परिसरातील फ्लॅटचे कुलूप तोडून 5 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर गावठाणात राहणाऱ्या सागर परमार (वय – 35) यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून 3 लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी हिंगणे-खुर्द परिसरातील आनंदविहार कॉलनीतील घरात बाल्कनीद्वारे प्रवेश करून 1 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काल घडली असून याप्रकरणी करमवीर शर्मा (वय – 42) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांनी दिली आहे.
























































