पुण्यातील 23 दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक, दुचाकी चोरीसाठी नांदेडहून पुण्यात प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी चोरण्यासाठी थेट नांदेडहून पुण्यात येउन दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांच्या सराईत टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 दुचाकी जप्त केल्या आहेत.

गौस मीरासाहेब शेख (वय -19, रा. नांदेड), रशिद मेहबूब शेख (वय -20) आणि शाहरुख पाशामिया शेख (वय – 21) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

वानवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी सुदर्शन बोरावके आणि शिरीष गोसावी यांना दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली. नांदेडहून काहीजण पुण्यात येऊन दुचाकी चोरून इतर जिल्ह्यात विकत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता तिघेही चोर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाराली गावचे असल्याचे समजले. त्यानुसार वानवडी पोलिसांनी बाराली गावात जाऊन तिघांसह दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहेत.

चौकशीत त्यांनी पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेल्या दुचाकी वेगवेगळ्या भागात विक्री केल्याची माहिती दिली.