
धुळे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत असल्याने रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे गहू आणि हरभऱ्यावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. पिकाची पुरेशी वाढ होणार नसल्याने गहू, हरभरा आणि मक्याच्या उत्पन्नात घट होईल अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात 12 डिसेंबरला गारपीठ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातर्फे देण्यात आली.
धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि मक्याची पेरणी केली आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल घडत आहेत. शुक्रवारी तर ढगाळ वातावरण होते. काही काळ पावसाचा शिडकावाही झाला. ढगाळ वातावरणामुळे गहू आणि हरभऱ्याला पाणी देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वातावरण कोरडे राहिले तर शेतात भरलेले पाणी गहू-हरभऱ्याच्या मुळापर्यंत पोहाचते. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याची वाढ चांगली होते. ढगाळ वातावरणामुळे पाणी झिरपणे बंद होऊन शेतात रोगांसाठी अनुकूल वातावरण तयार होते. अशा परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबेरा आणि हरभऱ्यावर किडीचा प्रार्दुभाव दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी किटकनाशकांच्या फवारणीचे काम हाती घेतले आहे.
गारपीट होण्याची शक्यता
ढगाळ वातावरणापाठोपाठ जिल्ह्यात 12 डिसेंबरला गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक किरण नांद्रे यांनी दिली. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा तर मक्यावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव होऊ शकतो. हरभरा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्याला गळती लागू शकते. फुलोरा वाचविण्यासाठी एम. 45 या औषधाची फवारणी करावी. ढगाळ वातावरण असताना गव्हाच्या क्षेत्रात पाणी भरु नये असेही नांद्रे यांनी सांगितले.























































