
>> अभय मिरजकर
लातूर जिह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांची नावे विशेष उल्लेखाने घेतली जातात. त्यामध्ये एक नाव म्हणजे डॉ. उगीले दांपत्याचे आहे. देशातील पहिल्या खासगी केवळ एचआयव्ही एड्स रुग्णांसाठीच रुग्णालयाची उभारणी करणारे दांपत्य म्हणजे डॉ. प्रदीप व डॉ. वंदना उगीले होय. जे नवे ते लातूरला हवे असे लातूरकरांसाठी म्हटले जाते. प्रत्येक क्षेत्रात लातूरकरांनी आपली छाप पाडलेली आहे. अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वावर वेगळा ठसा उमटवणारे दांपत्य म्हणून आता स्व. डॉ. प्रदीप उगीले आणि स्व. डॉ. वंदना उगीले यांचे नाव घेतले जाईल. लातूर जिह्यातील एक नामवंत कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱया राचमाले कुटुंबामध्ये 1 ऑगस्ट 1970 रोजी अहमदपूर येथे जन्म झाला. मराठवाडय़ाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया संभाजीनगर येथे सरस्वती भवन, शारदा मंदिर येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झालेले. वडील डॉक्टर, काका डॉक्टर त्यामुळे साहजिकच त्यांचाही कल वैद्यकीय शिक्षणाकडेच होता. लातूरातील शाहू महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले, तर वैद्यकीय शिक्षण गुलबर्गा येथिल वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. 1992 मध्ये त्यांचा विवाह डॉ. प्रदीप उगीले यांच्याशी झाला. 1998 मध्ये स्त्राrरोगतज्ञ म्हणून त्यांनी रुग्णांच्या सेवेला प्रारंभ केला. 2003 मध्ये देशातील पहिल्या खासगी एचआयव्ही एड्स रुग्णांसाठीच्या उगीले हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरची स्थापना डॉ. प्रदीप उगीले आणि डॉ. वंदना उगीले दांपत्यांने केली. एचआयव्ही एड्स झालेल्या महिला, मुलींच्या उपचारामध्ये डॉ. वंदना यांचे योगदान होते. 10 जुलै 2017 रोजी डॉ. प्रदीप उगीले यांचे अकाली निधन झाले. देशातील पहिले एचआयव्ही एड्सग्रस्तांसाठी उभारलेले हॉस्पिटल बंद पडू द्यायचे नाही या जिद्दीने उगीले हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरची संपूर्ण जबाबदारी डॉ.वंदना उगीले यांनी उचलली. स्वतः स्त्राr रोगतज्ञ असताना एचआयव्ही एड्स रुग्णांवर तज्ञ म्हणून उपचार कसे करणार म्हणून त्यांनी 2017 मध्ये एचआयव्ही एड्सची पदवी मिळवली आणि त्यानंतर एचआयव्ही एड्स तज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू केले. आलेल्या संकटाशी धैर्याने मुकाबला करीत वाटचाल करायची पण धीर सोडायचा नाही हा ठाम निर्धार असणाऱया डॉ. वंदना यांनी आपल्या डॉ.भावाचा मृत्यू झाल्यानंतर उगीले आणि राचमाले या दोन्ही कुटुंबाना सांभाळण्याची जबाबदारी उचललेली होती. मुलगी, बहीण, आत्या, पत्नी, आई, रुग्णांसाठी डॉक्टर या सर्वच जबाबदाऱया डॉ.वंदना यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या होत्या. मोफत आरोग्य तपासणी शिबिरातही त्यांचा सहभाग होता. प्रत्येक महिन्याचा एक दिवस ते मोफत रुग्णांची तपासणीही करत होत्या. डॉ. प्रदीप यांच्या निधनानंतरही मोठय़ा धैर्याने त्यांचे अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्यांनी उगीले हॉस्पिटलची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली होती. त्यासाठी संपूर्ण राचमाले कुटुंबीय, मित्र परिवार यांची खंबीर साथ डॉ. वंदना उगीले यांना मिळाली होती. मात्र 2020 हे वर्ष जसे संपूर्ण जगासाठी घातक ठरले तसे ते डॉ. वंदना यांच्यासाठीही घातक ठरले. जानेवारी 2020 मध्ये त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. अत्यंत दुर्मिळ प्रकारचा हा कर्करोग असल्याने त्याच्या उपचारासाठी त्या अमेरिकेमध्ये गेल्या. सहा महिन्यांनंतर जून 2020 मध्ये त्या हिंदुस्थानात परतल्या आणि लगेचच पुन्हा उगीले हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर या केवळ एचआयव्ही एड्स रुग्णांसाठी उभारण्यात रुग्णालयात रुग्णांच्या सेवेचे कार्य सुरू केले. जीवनातील प्रत्येक संकटात धैर्याने लढत असताना कर्करोगाशी मात्र त्यांची लढत अपुरी ठरली. लातूरकर मात्र डॉ. उगीले दांपत्याच्या कार्याला लक्षात ठेवतील.






























































