
>> रोहित पवार
‘‘पवार कुटुंबाचा घटक असल्याने शरद पवारसाहेबांना मला जवळून अनुभवता आलं. अर्थात, व्यक्ती कुटुंबातील असो की बाहेरची, पवारसाहेब आवश्यक तेथे आईसारखे मृदू आणि गरज असेल तेव्हा वडिलांसारखे कठोर असतात. ‘कुटुंब’ म्हणून असणारे आणि आई-वडिलांसारखे जपणारे ‘साहेब’ मला खूप महत्त्वपूर्ण वाटतात.’’
पवार साहेबांचा खरा ऊर्जास्रोत हा त्यांच्या आई शारदाबाई, पत्नी आणि माझ्या आजी प्रतिभाताई हा आहे. एका कुटुंबाचा डोलारा उभारण्याचं शहाणपण शारदाबाई आणि प्रतिभाआजींनी पेललं. ही कुटुंब सांभाळण्याची शिकवण माणसाला एक व्यक्ती म्हणून समृद्ध करत असते. अशा वेळी कुटुंब म्हणून असणारे, सर्वसामान्यांना अगदी आई-वडिलांप्रमाणे जपणारे साहेब मला खूप महत्त्वपूर्ण वाटतात.
आज आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस. खरं तर पवार हे एक आडनाव, पण पवारसाहेब म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांपुढे येणारं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे शरदचंद्रजी पवार.
साहेबांच्या वाढदिवसादिवशी मला अनेकदा लोक विचारतात की, साहेबांसंबंधित काहीतरी लिहा. विशेषकरून मी राजकारणात सक्रिय झालो त्या वेळेपासून, म्हणजे गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रत्येक वाढदिवसाला मी काहीतरी लिहितो. यात विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सातत्याने लिहावं लागलं तरी मला नवनवीन गोष्टी सापडत जातात हेच साहेबांचे विशेष. माझं भाग्य म्हणून मी आज पवार कुटुंबाचा घटक आहे. त्यामुळे एक नातू म्हणून मला साहेबांचा सहवास लहानपणापासून लाभत आलेला आहे. साहेबांना जवळून पाहण्याचं हे भाग्य मला मिळालं. तरीही एक व्यक्ती म्हणून साहेब कसे आहेत हे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक नातू म्हणून नाही की कुटुंबाचा एक घटक म्हणून नाही, तर साहेबांच्या प्रत्येक गोष्टीचा मला जवळून अनुभव घेता आला, त्या गोष्टी एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मला सांगायच्या आहेत.
राजकारण्यांसाठी कडू आणि सर्वसामान्यांसाठी गोड असे मला पवारसाहेब वाटतात. म्हणजे एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता साहेबांना भेटला तर साहेब एक व्यक्ती म्हणून त्याची, त्याच्या कुटुंबाची चौकशी करतात, त्यानंतर त्याच्या भूतकाळाबद्दल बोलतात. गाव आणि परिसरातील लोकांची, पीकपाण्याची चौकशी करतात. एक सगळं समोरची एक व्यक्ती म्हणून आत्मीयतेने बोलतात, पण समोरची व्यक्ती यानंतर राजकारणाच्या दिशेने गेल्यानंतर मात्र साहेब कठोर होतात. नेमकं कशासाठी राजकारणात येता, काय काम केलं, किती योजना राबवल्या याचा पाढाच जाणून घेतात. तिथे मात्र साहेबांना एक कठोर पालकत्वाच्या भूमिकेत असणारी व्यक्ती म्हणून मी पाहतो. बरं, या गोष्टी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या बाबतीतच घडतात असे नाही. व्यक्ती-मग ती कितीही जवळची असो, राजकारणाच्या बाबतीत साहेब 100 टक्के प्रॅक्टिकलच असतात हे मी सांगू शकतो. मला एक दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलेला किस्सा आठवतो. सातारा परिसरातील प्रगतशील शेतकरी बबनराव बडदरे यांना कुठूनतरी साहेब बंगलोरला जात असल्याचं समजलं. तेव्हा त्यांनी फोन करून वळसे पाटलांकडे निरोप दिला की, साहेबांना येताना बंगलोरवरून वैशाली नामक टॉमेटोचे वाण आणायला सांगा. वळसे पाटलांनीदेखील काहीसे संकोचूनच हा निरोप पवारसाहेबांना दिला. पवारसाहेबांचे वैशिष्टय़ म्हणजे साहेबांनी येताना पिशवीतून वैशाली जातीचे टॉमेटोचे वाण आणले. साहेब सर्वसामान्य लोकांचे आहेत हे आपण म्हणतो ते उगीच नाही. एकीकडे आपण साहेब राजकारणाबाबतीत किती प्रॅक्टिकल आहेत हे पाहतो तर दुसरीकडे असा किस्सा ऐकायला मिळतो.
आईसारखे मृदू आणि वडिलांसारखे कठोर असे मला साहेब वाटतात. कितीही जवळची व्यक्ती असो, साहेब हे वेळप्रसंगी कठोर वागतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक जण राष्ट्रवादी सोडून गेले. विरोधकांनी ओहोटी लागल्याची टीका केली, पण इथे साहेब प्रॅक्टिकल होते. मी पाचचे पन्नास केले आहेत हा साहेबांचा आशावाद होता. आमच्यासारख्या तरुणांनादेखील पक्षातील लोकांचे असे सोडून जाणे हे विश्वासघातकी तर वाटतच होतं, पण साहेबांनी आपला चमत्कार दाखवला. बरेच लोक या गोष्टीला चमत्कार का म्हणतात, तर ती गोष्ट आपणाला जमू शकत नाही म्हणून. साहेबांना एखादी गोष्ट पद्धतशीर जमू शकते, पण इतरांसाठी ती अशक्य असते म्हणूनच बऱयाचदा राजकीय चमत्कार घडून येतात. पण या चमत्कारांसाठी पाठीमागे काहीतरी ताकद असावी लागते. पवारसाहेबांचे राजकारण असो की समाजकारण, एखाद्याला खडे बोल सुनावण्यापासून ते एखाद्याला धीर देण्यापर्यंतचे राजकारण हे घरातील आईच्या तत्त्वाप्रमाणेच चालतं असं मला वाटतं.
(लेखक विधानसभा सदस्य आहेत.)


























































