
>> जयंत पाटील
शरद पवारसाहेब सलग 60 वर्षे सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. गेल्या चाळीस वर्षांत तर देशपातळीवर महाराष्ट्राचा चेहराच शरद पवारसाहेब आहेत. 1967 साली पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते अगदी आतापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत पवारसाहेबांची सक्रिय भूमिका राहिली आहे. आज जो आधुनिक महाराष्ट्र आपल्याला उभा दिसतो, त्याची पायाभरणी यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी केलीच, पण हे काम पुढे नेण्याची जबाबदारी पवारसाहेबांवर येऊन पडली. पवारसाहेबांनीदेखील ती अत्यंत समर्थपणे पार पडली. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी घेतलेले निर्णय आपण पाहिले तर त्यातून त्यांच्या निर्णयांनी कशा प्रकारे महाराष्ट्र घडला आहे याची जाणीव होते.
युवक काँग्रेस संघटनेतून संसदीय राजकारणात आलेल्या पवारसाहेबांनी जनता हा कायम जीवनाचा केंद्रबिंदू मानला आहे. सतत लोकांमध्ये राहणे आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवणे हेच त्यांचे जीवन आहे. कोणताही गरजू माणूस पवारसाहेबांकडे गेला आणि पवारसाहेबांनी त्या व्यक्तीच्या मदतीसाठी प्रयत्न केले नाहीत असे कोणतेच उदाहरण नसेल हे मी खात्रीने सांगू शकतो.
पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी घेतलेले काही निर्णय या राज्याच्या समाजमनावर अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यात अर्थात पहिला उल्लेख नामांतर आंदोलनाचा करावा लागेल. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात झालेले सर्वात मोठे आंदोलन म्हणून नामांतर चळवळीचा उल्लेख करावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महान सुपुत्र या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला आणि त्यांचे नाव विद्यापीठाला द्यायला विरोध होतोय याच्या प्रचंड वेदना पवारसाहेबांना झाल्या. पडेल ती राजकीय किंमत मोजून साहेबांनी तो निर्णय घेतला आणि तो राबवला. फुले, शाहू, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा खऱया अर्थाने शरद पवारच चालवू शकतात हे या निर्णयामुळे सिद्ध झालं.
तसाच निर्णय मंडल आयोगाबद्दल पवारसाहेबांनी घेतला. ज्या वेळी देशातील भले भले राजकीय नेते मंडल आयोगाचे नाव घ्यायला घाबरत होते, त्यावेळी पवारसाहेबांनी महाराष्ट्र मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र हे मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य बनलं. यामुळे या राज्यातील अनेक उपेक्षित जातींना शिक्षण व सरकारी नोकऱयांमध्ये संधी मिळून हा समाज प्रगतिपथावर येण्यास मदत झाली. नामविस्तार निर्णयाइतकाच मंडल आयोग अंमलबजावणीचा निर्णय धाडसी होता.
पुरोगामी लोकशाही दलाचा त्यांचा निर्णयदेखील राज्याला अधिक राजकीय स्थैर्य मिळवून देण्याचाच एक प्रयत्न होता. त्यापूर्वी राज्यात कधीच अशा प्रकारचा प्रयोग झाला नव्हता. त्यानंतरही थेट 2019 झाली महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने अशा प्रकारचा राजकीय प्रयोग झाला. पुलोदचे सरकार अत्यंत उत्तम काम करत असतानादेखील तत्कालीन केंद्र सरकारने ते बरखास्त केले यातूनच पवारसाहेबांनी केलेल्या या प्रयोगाचे महत्त्व समजून घेता येईल.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात सलग दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री म्हणून काम करताना देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले, शेतकऱयाला चांगला भाव मिळाला आणि देशातील सगळ्यात मोठी कर्जमाफी झाली. असे कितीतरी निर्णय सांगता येतील, ज्यामुळे महाराष्ट्र आणि देशाला पुढे जायला मदत झाली.
विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा अशा चारही महत्त्वाच्या सभागृहांचे सदस्य म्हणून पवारसाहेबांनी काम केले आहे. हा महाराष्ट्र घडवण्यात पवारसाहेबांचे अत्यंत मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने ते नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.
(लेखक राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)























































