निगर्वी अभिनेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय राजूरकर 

एक हरहुन्नरी आणि अभिनयावर प्रचंड श्रद्धा असणारे निगर्वी अभिनेते म्हणून रवी पटवर्धन यांची आठवण आज प्रकर्षाने होत आहे. रवी पटवर्धनांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अद्वितीय अभिनयाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मी मुंबईच्या चित्रनगरीमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करत असताना चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांशी वागण्याबोलण्याचा प्रसंग आला. यामध्ये अनेक चांगलेवाईट अनुभवही आले. यामध्ये मला ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत उत्तुंग असल्याचे जाणवले.

 ते परखड स्वभावाचे असल्याने दिग्दर्शकांना निर्भीडपणे बोलू शकत असत. वरवर जरी ते अत्यंत कठोर दिसत असले, वागत असले तरी मनाने मात्र प्रचंड कोमल होते. अभिनय कलेवर त्यांची गाढ श्रद्धा होती याची प्रचीती मला आली. तो प्रसंग इथे नमूद करणे आवश्यक वाटते.

साधारणतः दहा-बारा वर्षांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भुसनी या गावांमध्ये ‘कारभारी’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. यासाठी प्रेमा किरण, आनंद अभ्यंकर, प्रशांत गरुड, बागेश्री आणि रवी पटवर्धन ही बडी स्टार मंडळी चित्रीकरणासाठी आली होती. मालिकेचे दिग्दर्शन माझ्याकडे होते. मी पटवर्धन यांना प्रसंग समजून सांगितला आणि मला हवे तसे काम आपण द्याल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली. त्यावर मराठवाडय़ातील अनेक दिग्दर्शकांबरोबर चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव पाहता त्यांनी मला सहज घेतले आणि म्हणाले तू मला पेपर वर्क दाखव. त्यावर मी यांना स्क्रीनप्ले, पेपर वर्क दाखवले. ते पाहून ते अचंबित झाले. मी त्यांना डायलॉग सांगितले. ते म्हणाले, ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने करतो. शेवटी त्यांचे काम संपले. त्यानंतर मालिकेचा एपिसोड जेव्हा प्रसारित झाला त्यानंतर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले संजय, मला माफ कर, तू सांगितल्यानुसार काम केले असते तर हा भाग अतिशय सुरेख झाला असता.  इतक्या मोठय़ा मनाचा माणूस मी माझ्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीत पहिल्यांदा अनुभवला. त्यानंतर दौलताबाद किल्ल्याजवळ एक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते आले होते.  शूटिंग सुरू असताना या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्यांची टीम यांच्या नियोजनशून्य कारभारावर ते प्रचंड संतापले. एवढेच काय, त्यांनी त्या दिवशी शूटिंग बंद ठेवायला लावले. सायंकाळी त्या दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमला बोलावून म्हणाले, अख्ख्या मराठवाडय़ामध्ये दिग्दर्शक म्हणून संभाजीनगरमध्ये एक खरा दिग्दर्शक आहे. त्यांच्याकडून तुम्ही सिनेमा काय असतो, चित्रीकरण काय असतं आणि स्क्रिप्ट काय असते हे शिकून घ्या आणि नंतर चित्रपट करा. यावर सर्व लोक अचंबित झाले आणि म्हणाले, हा कोण माणूस आहे असे विचारले असता पटवर्धन म्हणाले की, संभाजीनगर येथील संजय राजूरकर हा मुलगा. चित्रपट दिग्दर्शक आणि स्क्रीनप्ले स्क्रिप्ट रायटिंग कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे. पटवर्धनांच्या या एका वाक्याने माझ्या चित्रपट कारकिर्दीला झळाली आली. त्यानंतर मला नवी ऊर्जा मिळाली आणि त्यातूनच पुढे अनेक चित्रपट आणि मालिका मी करू शकलो याचे श्रेय सर्वस्वी अभिनयावर श्रद्धा असणारे प्रामाणिक मनाचे रवी पटवर्धन हेच होते, एवढे मात्र नक्की.