
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर पाच हजार मेगावॅट किमतीचा सौरऊर्जा प्रकल्प आणावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी माडबन, मिठगवाणे, निवेली, करेल येथील जमीन संपादित केली होती. ही जमीन तशीच पडून असून त्या जमिनीचा वापर होत नसल्याने या जागेवर पाच हजार मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा. सौरऊर्जा प्रकल्प कोकण आणि महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरेल आणि संपादित जमिनीचा सदुपयोग ठरेल, असे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




























































