
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा अर्जुन रामपाल याला चौकशीसाठी समन्स बजावले असून येत्या 16 डिसेंबर रोजी मुंबईत त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. एनसीबीने काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या काही ड्रग्ज पेडलरने अर्जुन रामपाल याचे नाव घेतल्याने एनसीबीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलविल्याचे कळते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी उजेडात आलेल्या बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याला 13 नोव्हेंबर रोजी एनसीबीने चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी एनसीबीने तब्बल 7 तास चौकशी केली होती. तत्पूर्वी एनसीबीने 11 आणि 12 नोव्हेंबरला अर्जुनची प्रेयसी गॅब्रिएला डेमोट्रियाडेस हिचीदेखील चौकशी केली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी अर्जुन रामपाल याच्या चालकालादेखील ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अर्जुनची चौकशी होणार असल्याचे समजते.
गॅब्रिएला डेमोट्रियाडेसचा भाऊही अटकेत
अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमोट्रियाडेस हिच्या भावालादेखील एनसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांना चरस आणि अल्प्राजोलम औषध प्राप्त झाले होते. त्याच आधारे पोलिसांनी अर्जुनला चौकशीसाठी बोलावले होते.






















































