
केंद्र शासनाने ठरविलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये राज्याचा क्रमांक वर यावा यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत. पर्यावरणासंदर्भात आजचा विद्यार्थी जागरूक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमार्फत या उद्दिष्टांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी आज विधान भवन येथे आयोजित बैठकीत केल्या.
केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केंद्र शासनाने केलेला कृती कार्यक्रम व राज्य शासनाच्या कृती कार्यक्रमासंदर्भात उपसभापती नीलम गोऱहे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कूमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.एस. कुंदन आदी उपस्थित होते.
नीती आयोगाने शाश्वत विकासाची 17 उद्दिष्टांनुसार राज्यांचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार राज्यांनीही पृती आराखडे तयार करणे अपेक्षित आहे. शाश्वत विकासासाठी उद्दिष्टे ही व्यापक स्वरूपात आहेत. यानुसार समाजाच्या तळागाळातील वर्गाला सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. शाश्वत विकासामध्ये आपले स्थान कुठे आहे आणि ते आणखी वर आणण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल सर्वांनीच प्रयत्न करावेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन नीलम गोऱहे यांनी केले.
शाश्वत विकासासाठी कृतीबरोबर आकलनावर भर द्यावा – आदित्य ठाकरे
शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठताना कृतीबरोबरच त्या उद्दिष्टांच्या आकलनावर भर देणे आवश्यक आहे. राज्य शासन अनेक निर्णय घेत असते. हे निर्णय कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टांशी निगडित असतात. मात्र त्याची वर्गवारी केली जात नसल्यामुळे त्याचा बोध होत नाही. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येक मंत्रिमंडळ निर्णयामध्ये संबंधित निर्णय कोणत्या उद्दिष्टांशी निगडित आहे, याचा उल्लेख करावा. तसेच सर्व निर्णयांचे उद्दिष्टानुसार एकत्र पुस्तक तयार करावे व युनिसेफ व शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या.
महत्त्वाच्या योजनांचा आराखडा तयार करावा – मुख्य सचिव
कृती दशकाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात येत आहे. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक विभागाला जागरूक करण्यात येत आहे. त्यासाठी नवीन योजनांचा संबंध शाश्वत विकास उद्दिष्टांशी कशा प्रकारे आहे, त्याचे मोजमाप काय आहे यासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱयांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. तसेच दरवर्षी प्रत्येक विभागाच्या शाश्वत उद्दिष्टांशी संबंधित अशा पाच महत्त्वाच्या योजना व एक नावीण्यपूर्ण योजनांवर जास्त लक्ष द्यावे, अशा सूचना संजय कुमार यांनी दिल्या.



























































