
– योगेंद्र ठाकूर
शिवसेना आणि लोकाधिकार महासंघाने वेळोवेळी त्रिभाषा सूत्राचा पाठपुरावा केल्यामुळे आज बऱयाच केंद्रीय कार्यालयांच्या, रेल्वे, बँकांच्या, विमा कंपन्याच्या कार्यालयीन कामकाजात मराठीचा मानाने वापर केल्याचे दिसत आहे. आता महाविकास आघाडी सरकारचा मराठी भाषा विभाग महाराष्ट्रात सर्वत्र मराठीचा वापर होतो की नाही यासाठी जागरूक झाला आहे. कारण राष्ट्रपतींच्या 1960च्या आदेशानुसार महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयांनी लोकव्यवहारात मराठीचा वापर केलाच पाहिजे तो लोकाधिकार आहे.
महाराष्ट्रावर केवळ इंग्रजीचे आक्रमण नाही, तर हिंदीचेही आहे. महाराष्ट्राने त्रिभाषा सूत्र स्वीकारल्याने हिंदीही सक्तीची आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामीळनाडूला त्रिभाषा सूत्राशी काही देणेघेणे नाही. ते हिंदी भाषेतील परिपत्रक केराच्या टोपलीत टाकतात. तिथे फक्त चालते त्यांचीच प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी. हिंदीला सक्तीचा शब्द चालतो. मराठीला सक्ती चालत नाही. म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रातील केंद्रीय आस्थापनातील कार्यालयांना त्रिभाषा सूत्राची आठवण करून द्यावी लागते. तशी ती आठवण महाराष्ट्राच्या मराठी भाषा विभागाने गेल्या आठवडय़ात कोकण रेल्वे विभागाला करून दिली आहे.
त्याचे झाले असे, कोकण रेल्वे विभागाची प्रसिद्धीपत्रके, जाहिराती आणि फलकावर मराठीचा वापर करीत नसल्याची तक्रार करून एका जागरूक नागरिकाने शासनाचे लक्ष वेधले. वास्तविक, कोकण रेल्वेने केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार आपल्या कार्यालयीन कामात इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे; परंतु त्यांच्यावर अंकुश नसल्याकारणाने असे घडते आहे. जेव्हा शासनाच्या निदर्शनास आले तेव्हा मराठी भाषा विभागाने जाब विचारला आहे. परंतु कोकण रेल्वे व्यवस्थापनाला सांगावेसे वाटते की, 162 वर्षांपूर्वी ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेचे वेळापत्रक हे मराठीतून होते. हे मराठीतले वेळापत्रक 15 डिसेंबर 1958 साली प्रकाशित झाले होते. हे मराठीतील वेळापत्रक कोकण रेल्वे व्यवस्थापनाने नजरेखालून घालावे.
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील कार्यालये, विमा कंपन्या, तेल कंपन्या, तेल व नैसर्गिक वायू कंपन्या, सरकारी बँकांमध्ये त्रिभाषा सूत्राचा वापर करण्यासाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ गेली अनेक वर्षे लढा देत आहे. त्यामुळे बऱयाच केंद्रीय आस्थापनातील कार्यालयांत, विमा कंपन्या, बँका, विमान कंपन्या आदी कार्यालयांत मराठीलाच मानसन्मान मिळाला आहे.
केंद्राच्या विविध खात्यांनी वेळोवेळी त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीसाठी सूचना केल्या आहेत. जशा केंद्रीय गृहखात्याने 18 जानेवारी 1968 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार हिंदीभाषिक पट्टय़ात हिंदी व इंग्रजी आणि इतर राज्यांत हिंदी, इंग्रजीबरोबरच त्या राज्यांतील स्थानिक भाषेचा वापर शासनाच्या कार्यालयीन कामकाजात करावा, जेणेकरून स्थानिकांना शासकीय व्यवहारात भाषेची अडचण येणार नाही. दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ आदी राज्यात इंग्रजी आणि स्थानिक भाषेतच कार्यालयीन कामकाज चालते. हिंदी भाषेला हिंग लावून ती राज्ये विचारीत नाहीत. तर उत्तरेकडील हिंदी राज्यांत हिंदी आणि इंग्रजीतून कार्यालयीन कामकाज चालते. तेव्हा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा प्रश्न उरतो तो फक्त पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतच. त्यातही महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावरील राज्य आहे. मुंबई ही महाराष्ट्राच्या राजधानीबरोबरच देशाची आर्थिक राजधानी म्हणूनदेखील ओळखली जाते. महाराष्ट्रात मुंबईमध्ये केंद्रीय आस्थापनांची अनेक कार्यालये, रिझर्व्ह बँकेसह इतर प्रमुख बँकांची व विमा कंपन्यांची मुख्य कार्यालये इतर राज्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असल्याकारणाने त्रिभाषा सूत्राच्या वापरासंबंधी सतर्क राहावे लागते.
केंद्रीय गृहखात्याने 25 मार्च 1968 रोजी एक परिपत्रक जाहीर केले. त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्रीय कार्यालयातील अर्जाचे नमुने, माहिती साहित्य, करदात्यांनी भरावयाचे निरनिराळे अर्ज (स्थानिक भाषा) मराठीतही आवश्यक आहे. स्थानिक अर्जदाराने जर एखादा अर्ज अथवा माहिती, प्रादेशिक भाषेत भरली असेल तर तो अर्ज राष्ट्रपतींच्या 1960च्या आदेशानुसार डावलता येणार नाही असे स्पष्टपणे या परिपत्रकात नमूद केले आहे. रेल्वे स्थानकांमध्ये मराठीचा (स्थानिक भाषा) वापर आवश्यक आहे. तसे रेल्वे बोर्ड मॅन्युअल 1972 मध्ये पुन्हा म्हटले आहे. रेल्वे तिकीट खिडकी, सूचना, पार्सल बुकिंग, वेळापत्रके, आरक्षण आदींसाठी हिंदी, इंग्रजीबरोबरच मराठीचा वापर अनिवार्य आहे. तर पश्चिम रेल्वेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने 25 फेब्रुवारी 2002 रोजी पुन्हा एक परिपत्रक काढून मुंबईतील रेल्वे स्टेशनप्रमुखांना कळवले की, रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी सूचनात्मक घोषणा प्रथम मराठीतच करावी.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून 1983 मध्ये काढलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बँकांमध्ये प्रथम प्राधान्य मराठीलाच देण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 6 जून 1978 आणि 20 नोव्हेंबर 1978 रोजी झालेल्या बैठकीत बँकांतील अर्ज, खाते उघडण्यासाठी अर्ज, फलक सूचना आदींसाठी हिंदी व इंग्रजीबरोबरच मराठीतही उपलब्ध करण्यात यावे, अशा सूचना सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी असा क्रम असावा.
टपाल व तारखात्याच्या महाराष्ट्र विभागानेही टपाल खात्यातील नावाच्या पाटय़ा, सूचना फलकांवर प्रथम प्राधान्य मराठीलाच देण्यात यावे असे स्मरणपत्र सर्व टपाल खात्यांना नोव्हेंबर 1995 मध्ये पाठवले आहे.
हे केंद्रीय गृहखात्याने काढलेले आदेश असो अथवा केंद्रीय विभागाने वेळोवेळी काढलेली परिपत्रके शिवसेना व लोकाधिकार महासंघाच्या रेटय़ामुळे, आंदोलनामुळे निघाली आहेत. शिवसेना आणि लोकाधिकार महासंघाने वेळोवेळी त्रिभाषा सूत्राचा पाठपुरावा केल्यामुळे आज बऱयाच केंद्रीय कार्यालयांच्या, रेल्वे, बँकांच्या, विमा कंपन्याच्या कार्यालयीन कामकाजात मराठीचा मानाने वापर केल्याचे दिसत आहे. आता महाविकास आघाडी सरकारचा मराठी भाषा विभाग महाराष्ट्रात सर्वत्र मराठीचा वापर होतो की नाही यासाठी जागरूक झाला आहे. कारण राष्ट्रपतींच्या 1960च्या आदेशानुसार महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयांनी लोकव्यवहारात मराठीचा वापर केलाच पाहिजे तो लोकाधिकार आहे.































































