फायनलचे तिकीट बुक करण्यासाठी ‘रेस’, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फटका हिंदुस्थानी क्रिकेट संघाला बसला आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 360 रेटिंगसह पहिल्या स्थानावर विराजमान असलेला टीम इंडियाचा संघ आता नव्या नियमावलीमुळे दुसऱया स्थानावर आलेला आहे. तसेच आगामी ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत किमान चार ते पाच सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आल्यास विराट कोहलीच्या ब्रिगेडला 2021 सालामध्ये जून महिन्यात होणाऱया पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर व्हावे लागणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यामध्ये ‘रेस’ लागली आहे. मार्च महिन्यापर्यंतच्या कसोटी मालिकांच्या निकालावरच फायनलमध्ये पोहोचणारे दोन संघ ठरणार आहेत. त्यामुळे पुढील तीन महिने या तीन संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ताजा गुणतालिका (अव्वल चार संघ)

ऑस्ट्रेलिया – 0.82 (296 रेटिंग)
हिंदुस्थान – 0.750 (360 रेटिंग)
न्यूझीलंड – 0.625 (300 रेटिंग)
इंग्लंड – 0.608 (292 रेटिंग)

अव्वल दोनमध्ये राहण्यासाठी…

हिंदुस्थानला फायनलमध्ये पोहोचणाऱया अव्वल दोन संघांमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्याविरुद्धच्या एपूण आठ कसोटींपैकी चार ते पाच कसोटींमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. तसेच तीन लढती ड्रॉ राहायला हव्यात. न्यूझीलंडने पाकिस्तानला आगामी मालिकेत 2-0 अशा फरकाने हरवल्यास फायनलमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा वाढणार आहेत.

कांगारूंसाठी सोप्पा मार्ग

कांगारू अर्थातच ऑस्ट्रेलियन संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या ताज्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने हिंदुस्थानला 3-1 अशा फरकाने हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-1 अशा बरोबरीत राखल्यानंतरही त्यांना अव्वल दोनमध्ये राहता येणार आहे.