
मान्यतेशिवाय सुरू असलेल्या अनधिकृत शाळांची यादी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत मुंबईतील 206 शाळा बोगस आढळल्या आहेत. शहर व उपनगरातील या शाळा सरकार आणि महापालिकेची मान्यता न घेताच सुरू असून या शाळा तातडीने बंद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे, मात्र सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करत काही संस्थाचालक शाळा चालवत आहेत. सरकारी नियम धाब्यावर बसविणाऱ्य़ा शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानंतरही संस्थाचालक शाळा सुरूच ठेवतात. दरवर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांची यादी जाहीर होते. 2018-19 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शिक्षण विभागाने 231 बेकायदा शाळांची यादी जाहीर केली होती. तर 2019-20 मध्ये 211 शाळा बेकायदा जाहीर केल्या होत्या. यंदा या शाळांच्या संख्येत घट झाली आहे.
वॉर्डनिहाय अनधिकृत शाळा
एफ दक्षिण 4, बी 2, ई 4, सी 1, एफ उत्तर 11, जी उत्तर 6, एच पूर्व विभागामध्ये म्हणजेच मानखुर्द, गोवंडी परिसरामध्ये सर्वाधिक 67 बेकायदा शाळा आहेत. त्याखालोखाल पी/नॉर्थ म्हणजेच मालाड-मालवणी, पठाणवाडी या परिसरात 18 शाळा, एस वॉर्ड म्हणजे विक्रोळी-भांडुप परिसरात 15, एफ/नॉर्थ म्हणजे वडाळा, अॅण्टॉप हिल, शीव-कोळीवाडा या भागामध्ये 14, एल म्हणजे कुर्ला भागामध्ये 12, आर/साऊथ म्हणजे कांदिवलीमधील 10 शाळा बेकायदा असल्याचे पालिकेकडून घोषित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अन्य शाळेत दाखल करा
मान्यतेशिवाय सुरू असलेल्या शाळेच्या व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिका किंवा खासगी शाळेत दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्य़ांनी दिल्या आहेत. अनधिकृत ठरलेल्या बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. त्यानंतर हिंदी, मराठी, उर्दू या तीन भाषेच्या शाळांचीच संख्या अधिक आहे.























































