
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्याच्या हालचालींना नवी दिल्लीत वेग आला आहे. या स्पर्धेत दहा ते पंधरा जणांच्या नावाचे प्रस्ताव आले आहेत. डिसेंबरअखेर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन वर्षात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची नियुक्ती होईल असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत काँग्रेसच्या किमान डझनभर नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. पण त्यात प्रामुख्याने डॉ. अमरजितसिंह मनहास, भाई जगताप, सुरेश शेट्टी यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र अध्यक्षाच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पण अखेरच्या क्षणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांचेही नाव पुढे आले आहे.
मिलिंद देवरा हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पवनकुमार बन्सल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुन्हा मुंबई काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाकडे मिलिंद देवरा यांचे निकटचे संबंध लक्षात घेता त्यांच्याकडे पुन्हा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची शक्यताही नाकारता येत नाही अशी शक्यता काँग्रेसच्या एका नेत्याने वर्तवली. सर्वांना एकत्र घेऊन जाणारा बहुभाषिक चेहरा असलेल्या व्यक्तीची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती.
काँग्रेस मोठा पक्ष आहे. यामध्ये सर्वांची मते जाणून घेतली जातात. मध्यंतरी मुंबई दौऱयात ब्लॉक काँग्रेस कमिटीपासून सर्वांची मते जाणून घेतली. मुंबई अध्यक्षपदासाठी दहा ते पंधरा नावांचे प्रस्ताव आले आहेत. आता प्रत्येकाचे मत जाणून नव्या अध्यक्षाची निवड होईल. पुढील वर्षात जानेवारी महिन्यातच मुंबई काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. –एच. के. पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी

























































