
मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत अनेक रिक्त पदे असून त्या ठिकाणी नोकरी मिळवून देऊ अशी बतावणी करीत शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱया रॅकेटचा प्रॉपर्टी सेलने पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील तिघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक पालिकेचा कर्मचारी, दुसरा पालिकेचा निवृत्त कर्मचारी तर तिसरी आरोपी निवृत्त पोलीस अंमलदार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना पालिकेत नोकरी मिळवून देऊ असे आमिष दाखवून एक टोळी बेरोजगारांकडून पैसे उकळत असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलचे प्रभारी निरीक्षक केदारी पवार व एपीआय लक्ष्मीकांत साळुंखे यांना मिळाली. दरम्यान, एका महिलेने तिच्या मुलाला पालिकेत नोकरी मिळवून देण्याचे सांगत काही भामटय़ांनी त्यांची तीन लाख 50 हजार रुपये किमतीची फसवणूक केल्याची तक्रार शीव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज कोळी, एपीआय साळुंखे, सुनील माने, अमित भोसले व पथकाने गुह्याचा तपास सुरू करून पालिकेचा निवृत्त कर्मचारी प्रकाश सदाफुले (62), नितीन धोत्रे (39) आणि निवृत्त पोलीस अंमलदार प्रीती टाकर (67) असे तिघांना अटक केली. या तिघांवर बेरोजगारांना शोधून आणण्याची जबाबदारी होती. या गुह्यात आणखी अटकेची कारवाई होणार असून ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी प्रॉपर्टी सेलकडे संपर्प साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केईएम, राजावाडीत उभ्या उभ्या मेडिकल
आरोपी संबंधित बेरोजगारांना वैद्यकीय तपासणी केल्याचे बनावट प्रमाणपत्र देत होते. हे तिघे आपल्या सापळ्यात अडकलेल्या तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी केईएम किंवा राजावाडी रुग्णालयात घेऊन जायचे. तेथे मोकळ्या जागेत सर्वांना उभे करून आरोपींपैकी एक डॉक्टर तर दुसरा पालिकेचा अधिकारी म्हणून जायचे. ते दोघे डोळे, कान, दात बघायचे नाटक करून वैद्यकीय प्रमाणपत्र देत होते.
रॅकेटमध्ये बरेचजण आहेत. ते सर्व पोलिसांच्या रडावर आले आहेत. आता हे आरोपी तरुणांना अपॉइंटमेंट लेटर कसे बनवून द्यायचे याचा पोलीस तपास करीत आहेत.




























































