
हिंदुस्थानातील पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँकांना 11,300 कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याने 19 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची अफरातफर केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
नीरवच्या भावाचं नाव नेहल मोदी असं आहे. त्याच्याविरुद्ध अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका डायमंड होलसेल कंपनीकडून 2.6 मिलियन डॉलर (19 कोटी रुपये) हून अधिक किमतीचे हिरे नेहल याने विकत घेतले होते. त्या हिऱ्यांची अफरातफर झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
आता नेहलविरुद्ध न्यूयॉर्क कोर्टात खटला चालणार आहे. न्यूयॉर्क राज्याच्या कायद्यान्वये 1 मिलियन डॉलरहून अधिक रकमेची अफरातफर करणं हा फर्स्ट डिग्री गुन्हा मानला जातो. त्याची कमाल शिक्षा 25 वर्षांचा कारावास अशी आहे.
काय आहे हे प्रकरण
या प्रकरणाची सुरुवात 2015पासून झाली. नेहल याने 2015मध्ये एका कंपनीच्या सहकार्याने एलएलडी डायमंड्स या कंपनीकडून खोटे दस्तऐवज दाखवून 19 कोटींचे हिरे घेतले होते. हे हिरे कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीला विकणार असल्याचं दाखवलं. आणि कॉस्टको कंपनी आपल्याकडून हिरे खरेदीला तयार झाली असल्याचं त्याने एलएलडीला भासवलं.
त्यामुळे एलएलडीने नेहल याला हिरे दिले आणि पैसे परत करण्याची मुदत 90 दिवसांपर्यंत वाढवली. पण, त्याची रक्कम चुकवली नाही. त्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नेहल मोदी हा पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 13 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातही सहआरोपी आहे. तो हिंदुस्थानातून फरार असल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. तसंच, हिंदुस्थानच्या विनंतीवरून इंटरपोलनेही त्याच्याविरुद्घ रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
























































