
कोरोना विषाणूवरील लसीकरणाची पूर्वतयारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वेगाने करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्राच्या कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची पहिली बैठक झाल्यानंतर ही कार्यवाही जलद गतीने सुरु आहे. सुरुवातीला लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही 8 लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत.
मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोविड 19 या लस वितरणासाठी वापरण्यात येईल. तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्तातंर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत. लसीकरणासाठी एस विभागातील कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. कोल्ड स्टोरेज सुविधा तयार करताना केंद्र सरकारच्या मानांकनानुसार कामगिरी, गुणवत्ता, सुरक्षितता आदींचे निकष समितीकडून वेळोवेळी पाळले जाऊन त्यानुसार परीक्षण केले जाणार आहे.
31 ऑक्टोबर 2017 रोजीच्या परिपत्रकानुसार, कोल्ड स्टोरेजसाठी आवश्यक तांत्रिक समितीची स्थापना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. या समितीमध्ये नॅशनल कोल्ड चेन रिसर्च सेंटरमधील तांत्रिक तज्ज्ञ तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर तज्ज्ञ आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील प्रतिनिधी कार्यरत आहेत.
केंद्र सरकार आणि पीक्यूएस कॅटलॉग यांच्या तांत्रिक वैशिष्ट्य़ानुसार योग्य क्षमतेची दोन वॉक-इन-कूलर संच उपकरणे आणि एक वॉक-इन-फ्रिजर संच उपकरणे खरेदी करण्यात येणार आहे. एस विभागाचे सहाय्यक अभियंता (देखभाल) यांच्यामार्फत 2 आरोग्य केंद्र आणि जिल्हा क्षयरोग विभाग यांचे स्थलांतर व स्थापित करण्याचे कामकाज केले जाणार आहे. राज्य सरकारमार्फत 225 लीटर क्षमतेचे 17 आयएलआर (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर) चा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यापैकी 8 आयएलआर नियोजित लसीकरण केंद्रांना (4 वैदयकीय महाविदयालय व 4 उपनगरीय रुग्णालय) देण्यात आले आहेत.
सुरुवातीला लसीकरणासाठी केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही 8 लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार या प्रत्येक केंद्राने 3 ते 5 आदर्श लसीकरण स्थळे निर्देशित करावयाची आहेत. संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालय) हे सुलभ आणि प्रभावी लसीकरणासाठी संघ नेमून त्यांच्या सदस्यांना निर्देश देतील. संबंधीत रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक हे मध्यवर्ती लससाठा शीतगृहातून कोविड 19 लस उपलब्ध झाल्यानंतर ह्या लसीची लसीकरण यादी तयार करण्यासाठी संबधित कर्मचारी (औषध निर्माता / शीतसाखळी हाताळणी कर्मचारी) यांची निवड करतील.
लसीकरणासाठी विलेपार्लेतील डॉ. कूपर रुग्णालयात एक आदर्श लसीकरण केंद्र विकसित केले जात आहे. जेणेकरून इतर केंद्रांमध्ये त्याची प्रतिकृती तयार केली जाऊ शकेल. तसेच फ्रंटलाइन कामगारांसाठी दुसऱ्या टप्प्यातील लस उपलब्धतेनुसार अतिरिक्त केंद्रे सुरू केली जातील. 14 आणि 15 डिसेंबर 2020 रोजी प्रशिक्षकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. सहाय्यक आरोग्य अधिकारी (विशेष लसीकरण कार्यक्रम) विभागातील चार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डब्ल्यूएचओ- एसएमओ, यूएनडीपी-कार्यक्रम अधिकारी हे मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित आहेत. सोबत, वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, वरिष्ठ अधिकारी (दवाखाने) आणि सहाय्यक वैदयकीय अधिकारी (विलका) या सर्व प्रशिक्षकांचे आवश्यक प्रशिक्षण घेतले जात आहे. हे सर्व प्रशिक्षक आपापल्या केंद्रांवर आणि क्षेत्र पातळीवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. हे सर्व प्रशिक्षण दिनांक 7 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल.
लसीकरणानंतर प्रतिकूल घटना उद्भवल्यास, सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, अशा घटनांच्या व्यवस्थापनासाठी उपनगरीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये येथे पुरेशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट, नेफरोलॉजिस्ट, श्वसन चिकित्सा विशेषज्ञ यांचा समावेश करण्यासाठी विद्यमान समितीचा विस्तार केला जाईल. केंद्र सरकारकडून 8 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स्) दिलेल्या सुचनेनुसार आरोग्य सेवक (हेल्थ केअर वर्कर्स) यांचा डेटा बेस कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जात आहे. आतापर्यंत सुमारे 80 हजार सेवकांचा डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. एकूण 1 लाख 26 हजार 378 सेवकांचा डेटा अपलोड करण्याची ही कार्यवाही देखील वेगाने सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, फ्रंटलाइन अभियंते, वाहन चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमी कर्मचारी आणि देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांकडून आघाडीच्या कामगारांचा डेटा संकलित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. फ्रंटलाईन वर्कर्सचा डेटा एकत्रित करून 25 डिसेंबर 2020 पर्यंत कोविन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी नगर विकास विभागाने निर्देशित केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.


























































