
लसीकरणामुळे नवीन वर्षात जगाची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला असतानाच या व्हायरसने रूप बदलले आणि पुन्हा डोक्याला शॉट दिला आहे. कोरोनाच्या नव्या व्हायरसने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जीवघेणी (डेडली व्हायरस) आणि 70 टक्के जास्त वेगाने पसरणारा हा अत्यंत खतरनाक नवीन व्हायरस आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सर्वत्र टायर-4 लॉकडाऊन जाहीर केले असून, घरातच ख्रिसमस आणि 31 डिसेंबरची रात्र साजरी करा. नातेवाईक, मित्रांच्या संपर्कात येऊ नका, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान बोरिस जॉन्सन सरकारने नागरिकांना दिले आहेत.
2020 हे वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. वर्ष संपताना मात्र कोरोनावर उपचारासाठी अनेक लसीची निर्मिती झाली. काही लसींची अंतिम चाचणी सुरू आहे. तर काही लसींचे डोस देण्यास ब्रिटन आणि अमेरिकेत सुरुवात झाली आहे. हे आशादायक चित्र असतानाच 2021च्या स्वागतापूर्वी कोरोना व्हायरसने नवे भयंकर रूप घेतल्याचे समोर आले आणि जगाची चिंता पुन्हा वाढली आहे.
लंडनबाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी
नव्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये आहे. येथून बाहेर पडण्यासाठी विमानतळे, रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी आहे. आपली वाहने घेऊन लोक लंडनबाहेर पडत आहेत. सर्वत्र ट्रफिक जाम झाले आहे.
सध्याच्या लसीचा उपयोग होणार का?
आतापर्यंत फायझर, कोवॅक्सिन, ऑक्सफर्ड-अॅस्टाझोनिका मॉर्डनासह अनेक लसींची निर्मिती झाली आहे. कोविड-19 वर उपचार या लसींमुळे होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसने रुप बदलले. नवीन कोरोना जास्त धोकादायक असल्यामुळे या लसींचा प्रभाव ठरेल का? याबाबत शंका उपस्थित होत आहे. हा कोरोना विषाणू आणखी रूप बदलू शकतो, अशी भीती केंब्रिज विद्यापीठातील प्रा. रवि गुप्ता यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेतही नवीन विषाणू
कोविड-19च्या नवीन व्हायरससारखी लक्षणे असलेला व्हायरस दक्षिण आफ्रिकेतही आढळून आल्याचे वृत्त आहे. हा नवीन कोरोना व्हायरस आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टायर-4 लॉकडाऊन
– ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक घेतली आणि त्यानंतर ब्रिटनवासियांना संबोधित करताना नवीन कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली.
– टायर-4 लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा पंतप्रधान जॉन्सन यांनी केली.
– लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत असले तरी, या व्हायरसचा संसर्गवाढीचा प्रचंड वेग पाहता संपूर्ण ब्रिटनमध्येच कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
– 25 डिसेंबरचा ख्रिस्मस हा ब्रिटनमधील मुख्य सण. त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री साजरे होणारे न्यू इअर सेलिब्रेशन यावर्षी घरातच साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहेत.
– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार, पब्स, म्युझियम्स, पार्क बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता मेट्रोसेवा बंद राहील. शाळा-कॉलेज, विद्यापीठेही बंद ठेवाली जाणार आहेत.
– लोकांनी घराबाहेर पडू नये. नातेवाईक, मित्रांना भेटण्यासाठी कोणाच्या घरी जाऊ नये, अशीही सूचना त्यांनी केली आहे.





























































