
इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धायरी परिसरात घडली आहे. लॉकडाउनच्या अगोदरच केलेला व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपेश सुरेश पाटील (वय – 31, रा. शार्विल सोसायटी, धायरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते शार्विल सोसायटीच्या आठव्या मजल्यावर राहत होते. लॉकडाउनच्या अगोदर त्यांची आई व पत्नी हे गुजरात येथे उपचारासाठी गेले होते. त्यांना देखील शुगरचा आजार होता. गेल्या काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. 19 डिसेंबरला त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. त्यामध्ये आर्थिक व मानसिक कारणामुळे आत्महत्या करत आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.
इव्हेन्ट मॅनेजमेंटचा व्यवसाय चालत नव्हता
धायरी परिसरात पाटील यांचे क्लिनिक देखील होते. पण, ते व्यवस्थित चालत नसल्यामुळे त्यांनी लॉकडाउनच्या अगोदर काही दिवसच इव्हेन्ट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यामुळे त्यांचा बिझनेस बंद झाला. यामध्ये त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्याबरोबरच त्यांना शुगरचा त्रास सुरू होता. यातून ते नैराश्यात गेले. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केल आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.




























































